Kolhapur Crime: बदल्यासाठी हनी ट्रॅपद्वारे प्रेमाची भुरळ घातली, अन् लूटमार केली; महिलेसह पाचजणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 11:51 AM2023-07-18T11:51:02+5:302023-07-18T11:52:41+5:30
वहिनीची विनंती, दिराचा कट
कोल्हापूर : मोबाइलवर अश्लील संभाषण करणाऱ्या तरुणाला अद्दल घडवण्यासाठी हनी ट्रॅपद्वारे प्रेमाची भुरळ घालून त्याची लूटमार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी (दि. १७) एका महिलेसह पाचजणांना अटक केली. बालिंगा पाडळी (ता. करवीर) येथे २५ जूनला झालेल्या लूटमारीनंतर किरण उत्तम पाटील (रा. जठारवाडी, ता. करवीर) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण पाटील हा मोबाइलवरून अश्लील संभाषण करीत असल्याच्या रागातून त्याचा काटा काढावा किंवा त्याला अद्दल घडवावी, असे कोमल पाटील हिने तिचा दीर इंद्रजीत याला सांगितले. त्यानंतर इंद्रजित याने इन्स्टाग्रामवर शुभांगी कदम या नावाचे बनावट खाते तयार करून किरण याच्यासोबत चॅटिंग सुरू केले.
प्रेमाची भुरळ घालून त्याला २५ जूनला बालिंगा पाडळी येथील एका शाळेजवळ बोलवले. त्यावेळी नंबर प्लेट नसलेल्या एका मोपेडवरून आलेल्या तिघांनी किरण याला अडवून, ‘आमच्या बहिणीला अश्लील मेसेज का करतोस?’ अशी विचारणा करीत मारहाण केली. तसेच जबरदस्तीने त्याच्याकडील मोबाइल आणि दोन हजार रुपये काढून पोबारा केला.
यांना झाली अटक
कोमल कृष्णात पाटील (२९), इंद्रजित कृष्णात पाटील (२८, दोघे रा. आकुर्डे, ता. पन्हाळा), नितीन पांडुरंग पाटील (३२), मोहसिन चांदसाब मुल्ला (२४) आणि करण शरद रेणुसे (२३, तिघे रा. कोपार्डे, ता. करवीर) या पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली. फिर्यादी किरण पाटील याला मारहाण करून त्याच्याकडून जबरदस्तीने काढून घेतलेला मोबाइल, दोन हजारांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एक लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील तपासासाठी पाचही संशयितांचा ताबा करवीर पोलिसांकडे देण्यात आला.
वहिनीची विनंती, दिराचा कट
फिर्यादी किरण पाटील हा मोबाइलवर अश्लील संभाषण करून त्रास देत होता, असा दावा संशयित कोमल पाटील हिने केला आहे. या दाव्याची सत्यता पडताळण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तिच्या विनंतीवरूनच दीर इंद्रजित याने कट करून मित्रांच्या मदतीने लूटमार केल्याचे तपासात समोर आले.
यांनी केली कारवाई
उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह सागर चौगले, प्रीतम मिठारी, रणजित कांबळे, रफिक आवळकर आणि सुप्रिया कात्रट यांनी गुन्ह्याचा तपास केला.