लायनीत कलकल... पंक्चर सायकल....
By admin | Published: January 6, 2017 12:24 AM2017-01-06T00:24:29+5:302017-01-06T00:24:29+5:30
फुल्ल बाजा
नमस्कार मंडळी.. बाज्याचा तुमा समद्यास्नी रामराम! ह्यापूर्वी कानाकंडं परिचित हुतो.. आता डोळ्यास्नी भेटाय येतोय. काय लै फरक न्हाई. कानाला खडा लावायचा आनि डोळ्यात तेल घालून वाचायचं. राहता राहिली ल्यांगवेज... तर ती आपली पैल्यापास्नं अशीच.. गल्लीतली! ष्टाईल बी तीच... कळ तर काडायची.. खरं दुखाय न्हाई पायजे! आणि काय लागलं तर ओके भाऊ हाईतच की पाठीशी!
तर परवा काय झालं... सकाळी धुकं लै पडल्यालं. लवकर उठलो आनि आदी लायनीत जाऊन हुबारलो. व्हय... नंतरनं लायनीत गर्दी वाढायच्या आत सकाळी उठून नंबर लावल्याला बरा असतोय, असा हल्लीचा अनुभव हाय. पाठूपाठ टाय लावल्याला एक सायेब गडबडीनं माज्या मागं यून हुबारला. तवर तेच्या मागनं आनि धा बाराजण यून लायनीत हुबारली. खरं लाईन काय केल्या फुडं सरकंना. हुबं राहून राहून पायाच्या पार खुट्ट्या मोडायची येळ आली.
माज्या मागल्या टाय लावल्याल्या सायबानं तर वैतागून माज्या हातातील पान्याची बाटली मागितली आनि काय बोलायच्या आत गटटाटा पिऊन आर्धी सपिवली बी. तवर धुकं हटलं आनि माजा नंबर बी आला. आर्धी शिल्लक राहिलेली बाटली घ्यून पायरी चढून मी वर आलो आनि दरवाजा लावून घ्यायला मागं वळून बगतो तर काय!
माज्या मागं हुबारल्याली समदी फेंदारल्यागत माज्या डोस्क्यावरल्या ‘सुलभ शौचालया’च्या पाटीकडं बगत्याली!
आर्धी बाटली गटटाटा संपिवल्याला सायेब माज्याकडं खाऊ की गिळू या नजरंनं का बगत असावा, हेचा ईचार करतच मी कडी घातली.
जाऊंदे तिकडं म्हटलं मनात. आपली अडचन झाली तरी पिल्या पान्याचं उपकार आपून काडायला नगोत.अंघोळ बिघोंळ आवरून रिक्षा काढायला बाहेर पडतोय तर दारात उत्तरेश्वरातला अखिलेश हुबा. म्हटलं, काय रे बाबा.. येरवाळीच आलाईस! तर मुलायम आवाजात म्हंटला, तुमच्या गल्लीत आल्तो शिवपाल काकांकडं, तर तेंच्या दारातच ‘सायकल’पंक्चर झाली. म्हनून मग तुजी आठवन झाली. तुज्या वळकीचा कोन पंक्चर पेशालिस्ट आसला तर बग की! म्हटलं, ‘आमच्याकडं एक पेशालिस्ट हाईत. ‘घड्याळ’ लावून दोन मिंटात तुजी सायकल दुरुस्त करतील, पन तेंची फी तुला परवडायची न्हाई.’ पटत नसंल तर तुमच्या आबांना जाऊन ईच्चार. तेंच्या जुन्या वळकीतलं हाईत ते! आबांचं नाव काडलं तस अखिलेश फेंदारलंच. म्हनला, बाबा, आबांचं नाव एवढं नाव काढू नगोस बाबा. तेंचीच ‘सायकल’ पळवून आनलिया मी!आरं मग पंक्चर कशानं झाली, मी ईचारलं. ‘डब्बलसीटमुळं’. ‘डब्बलसीट?’व्हय.. आबा सांगत हुतंत. तरीबी तेंची नजर चुकवून रामगोपाल काकास्नी डब्बलसीट घेतलं आनि समदा घोळ झाला.आता निस्तारायचा कसा ते सांग. म्हटलं, लै टेन्शन घ्यू नगोस. तुमच्या उत्तरेश्वरातच एक भाद्दर हाय. त्यो काडून दिल तुज्या सायकलचं पक्चर. ‘कोन?’ ‘अमर अॅण्ड कंपनी’.कोन अमर अॅण्ड कंपनी? नगोरे बाबा. एकतर तेंनी सायकलचं दुकान बंद करून फटाक्याचं दुकान टाकायच्या नादात हाईत आणि दुसरं म्हंजे आमच्या आबांच्या संध्याकाळच्या बैठकीतलं हाईत. पंक्चर राहील बाजूला. सायकल गायब करतील आनि नवी घंटी लावून आबांच्यासमोर पेश करतील. शेवटी अखिलेशला म्हटलं भावा, तुज्या भावकीतला आनि पै पावन्यातला तिडा लै दांडगा हाय. माज्याच्यानं निस्तरायचा न्हाई. तू तुज्या सायकलला नवीन टायर बशीवल्यालंच बरं. दुकान शक्यतो शाहूपुरीतलंच बघ आनि मी रिक्षा काढली.
भरत दैनी