म. गांधींचे राजकीय गुरू, शिष्य महाराष्ट्रातीलच
By Admin | Published: October 9, 2015 12:25 AM2015-10-09T00:25:12+5:302015-10-09T00:41:03+5:30
सदानंद मोरे : शिवाजी विद्यापीठात ‘विमर्श व संवाद’ या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर : महात्मा गांधीजींना नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या रूपाने महाराष्ट्राने ‘राजकीय गुरुत्व’ आणि आचार्य विनोबा भावे यांच्या रूपाने सर्वांत मोठा पहिला शिष्यही प्रदान केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी येथे गुरुवारी केले.शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र, इतिहास अधिविभाग व गांधी अभ्यास केंद्रातर्फे ‘विमर्श व संवाद’ या अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ यावर बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. आर. बी. पाटील, तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. ज. रा. दाभोळे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी‘विमर्श व संवाद’ या एन. ए. निकम लिखित व डॉ. ज. रा. दाभोळे अनुवादित पुस्तकाचे डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.डॉ. मोरे म्हणाले, नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची राजकारणाच्या अध्यात्मीकरणाची संकल्पना गांधीजींना भावली. त्या आधारे अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील चळवळ यशस्वी केली. या पार्श्वभूमीवर गोखले- लोकमान्य टिळक यांच्यातील दरी कमी करण्याचे त्यांनी प्रयत्न केले. गांधीजींना भारत समाजसेवक संघटनेचे सदस्यत्व देण्याचे गोखले यांनी ठरविले होते; पण प्रस्थापित सदस्यांमुळे ते होऊ शकले नाही; अन्यथा गांधीजी पुण्यातच राहिले असते आणि गोखले यांच्या माघारी नेमस्तांचे नेतृत्व त्यांच्याकडे आले असते. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा ‘लोकमान्य ते महात्मा’ या संक्रमणात दडलेला आहे. गांधीजींबद्दल समाजमाणसांत पसरलेले विविध प्रवाद-अपप्रवाद पाहता हे संक्रमण अद्यापही पूर्ण झाले नाही. ‘विमर्श व संवाद’ हे पुस्तक म्हणजे तत्त्वज्ञानाचे पूर्वसुरी तत्त्वज्ञानाबद्दल नेमका कोणता विचार करीत असत, यासंदर्भातील महत्त्वाचा दस्तावेज आहे. डॉ. दाभोळे म्हणाले, तत्त्वज्ञान अभ्यासकांच्यादृष्टीने हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी डॉ. वासंती रासम, प्रकाश पवार, भगवान माने, आदी उपस्थित होते. डॉ. भारती पाटील यांनी प्रास्ताविक केले.
मराठ्यांच्या अपेक्षांना छेद...
ब्रिटिशांनी भारत जिंकला म्हणजे दिल्लीचे तख्त ताब्यात घेतले. तथापि, ब्रिटिशांनी प्रत्यक्षात ज्यांच्याशी लढाया करून भारत जिंकला, ते मराठे होते. त्यामुळे राजकारणाची समज, लढवय्येपणा, धडाडी या बळावर स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राच्या नेतृत्वाने वर्चस्व राखले. त्यामुळे महात्मा गांधी यांचा राजकीय पटावरील उदय हा मराठ्यांच्या अपेक्षांना छेद देणारा ठरला, असे निरीक्षण डॉ. मोरे यांनी यावेळी नोंदविले.