यंत्रमाग कामगारांना महागाई भत्त्यानुसार मजुरीवाढ मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:20 AM2021-01-15T04:20:45+5:302021-01-15T04:20:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांना महागाई भत्त्यानुसार मजुरीवाढीची घोषणा झाली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून त्याची अंमलबजावणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांना महागाई भत्त्यानुसार मजुरीवाढीची घोषणा झाली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून त्याची अंमलबजावणी झाली नाही. ती आज, शुक्रवारी न झाल्यास यंत्रमाग कामगारांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा कामगार संघटना संयुक्त कृती समितीने पत्रकार परिषदेत दिला.
सन २०१३ साली इचलकरंजीत महागाई भत्ता मजुरीवाढीसाठी मोठे आंदोलन झाले होते. त्यावेळी तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ, यंत्रमागधारक व कामगार संघटना प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये सहा-सहा महिन्यांचे दोन महागाई भत्ते एकत्र करून सहायक कामगार आयुक्तांनी ३१ डिसेंबरपूर्वी मजुरीवाढ जाहीर करावी व १ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करावी, असा करार या बैठकीत करण्यात आला. दरम्यान, सन २०१३ ते २०१७ पर्यंत २४ पैशांची मजुरीवाढ यंत्रमाग कामगारांना मिळाली आहे. मात्र, सन २०१८ ते २०२१ पर्यंतची ३० पैशांची मजुरीवाढ अद्यापही मिळाली नाही. तसेच यंत्रमाग कारखान्यातील इतर घटकांना दहा टक्के पगारवाढ मिळाली पाहिजे, असे मत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेस भरमा कांबळे, राजेंद्र निकम, हणमंत लोहार, धोंडिबा कुंभार, मारुती आजगेकर, आनंदा गुरव, बंडोपंत सातपुते आदी उपस्थित होते.
चौकट ९८ कोटी रुपयांची लुबाडणूक सन २०१८ पासून यंत्रमागधारकांनी यंत्रमाग कामगारांची वाढलेली मजुरीवाढ बुडवून सुमारे ९८ कोटी रुपयांची लुबाडणूक केली आहे. तसेच सन २०२१ मध्ये वाढलेल्या आठ पैशांची मजुरीवाढ न देण्याची भूमिका यंत्रमागधारकांनी घेतली आहे. त्यामुळे यावर्षीची मजुरीवाढ न मिळाल्यास पुन्हा ३३ कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे मत कामगार नेते भरमा कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.