‘माऊली’ला मदत तर दूरच, साधी भेटही दुर्लभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:45+5:302021-04-20T04:23:45+5:30
कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गामुळे कोल्हापुरातील अनेक वृद्धाश्रमांमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठांना मदतीच्या रूपाने नियमित भेटणारी माणसे दिसेनाशी झाली आहेत. ...
कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गामुळे कोल्हापुरातील अनेक वृद्धाश्रमांमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठांना मदतीच्या रूपाने नियमित भेटणारी माणसे दिसेनाशी झाली आहेत. त्यांच्या मानसिकतेत बदल होऊ लागल्याने चेहऱ्यावरही चिंतेची लकेर दिसू लागली आहे. त्यात मदतीचा झरा आटल्यामुळे अनेक वृद्धाश्रम चालविणाऱ्या काळजीवाहकांचीही चिंतेत भर पडू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वृद्धाश्रमात राहणाऱ्यांची भिस्त ही दात्यांवर अधिक असते. त्यात अनेक दाते हे नात्यापलिकडे जाऊन आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून येऊन ज्येष्ठांची विचारपूस करीत असतात. ही आपुलकीने येणारी माणसे संचारबंदीमुळे दिसेनाशी झाली आहेत. दोन हितगुजाच्या गोष्टी कुणाबरोबर करायचा, असा प्रश्न आजी-आजोबांना पडला आहे. अशीच परिस्थिती संभाजीनगरातील विजयनगर कॉलनीतील माऊली केअर सेंटरचीही झाली आहे. संस्थेला नियमित अनेक दाते धान्य, औषधे आणि आर्थिक स्वरुपात मदत देतात. मात्र, कोरोनामुळे हा मदतीचा झरा आटू लागला आहे. त्यामुळे वृद्धाश्रमातील निराधार आणि वृद्धांचा खर्च कसा चालवायचा, असा प्रश्न काळजीवाहकांना पडला आहे.
वृद्धाश्रमातील एकूण सदस्य संख्या - ४८
स्त्री - २१
पुरुष -२७
भेट देणाऱ्यांची संख्या आली एक-दोनवर
संभाजीनगरातील विजयनगर कॉलनीमधील माऊली केअर सेंटरमध्ये मदतीच्या बहाण्याने रोज १५ ते २० लोक भेट देत होते. विशेषत: शनिवारी, रविवारी येणाऱ्यांची संख्या मोठी होती. यादिवशी किमान ८० ते १०० स्त्री-पुरुष दाते भेट द्यायचे. आता ही संख्या दिवसाला एक-दोनवर आली आहे.
मदतीचा ओघ आटला
कोणाच्या तरी ओळखीने लोक माऊली केअर सेंटरमध्ये वाढदिवस साजरे करण्याच्यानिमित्ताने येतात. त्यात मदत म्हणून धान्य, कपडे आणि आर्थिक मदतही देतात. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून हा मदतीचा झराही थांबला आहे. सेंटरमधील वृद्धांना आपल्यामुळे कोरोना संसर्ग होऊ नये, म्हणून अनेकांनी काळजीपोटी पाठ फिरवली आहे. याचा परिणाम म्हणून सर्वचप्रकारची मदत थांबली आहे.
प्रतिक्रिया
‘अरे देवा, पूर्वीसारखं कर रे बाबा..’
आम्हाला नवीन चेहरा दिसणे बंद झाले आहे. इथं दिवसभरात नेहमी वर्दळ असायची. त्यातून दिवस कसा निघून जायचा, हे कळत नव्हते. आता निर्मनुष्य रस्ते, भेटायला येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. ‘अरे देवा, हे सगळं लवकर पूर्वीसारखं कर रे बाबा..’
- एक आजी
हितगुज करायलाही कोण येईना
मला नेहमी एक व्यक्ती खाऊ घेऊन यायची, इतकंच नाही, तर रोजच्या जीवनात काय घडले, याचीही माहिती द्यायची. मी पण ते निमूटपणे ऐकून घेत होते. कारण त्या माझ्या आयुष्यातील अडचणी सारख्याच होत्या. मला त्या ऐकताना भरून येत होते. कोरोनामुळे ती व्यक्तीही येथे येईनाशी झाली आहे.
-एक आजी
‘माऊली’ला कमी पडू देऊ नको
या कोरोनाने सगळे वाटोळे केले आहे. आम्हाला भेटायला येणारी माणसेही येईनाशी झाली आहेत. कपडे, खाऊ, धान्यही सगळेच कमी येऊ लागले आहे. घरातल्यांनी सोडले आहेच; पण ज्या ‘माऊली’ने आधार दिला आहे, त्याला कमी पडू देऊ नकोस देवा.
- आजोबा
कोट
कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मदतीचा हातही दात्यांनी आखडता घेतला आहे. तरीसुद्धा येथील निराधार आणि ज्येष्ठांना काहीही कमी पडू देत नाही. ज्या दात्यांना शक्य आहे, त्यांनी आटलेला हा मदतीचा झरा पुन्हा मदतीच्या रुपाने सुरू करावा.
- दीपक कदम, काळजीवाहक, माऊली केअर सेंटर
फोटो : १९०४२०२१-कोल-माऊली केअर सेंटर०१
ओळी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांच्याही चिंतेत भर पडली आहे. त्याचे प्रतीक कोल्हापुरातील संभाजीनगरातील माऊली केअर सेंटरमध्ये सोमवारी पाहण्यास मिळाले.