पक्ष्यांसाठी बांधली शेतात विहीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 05:57 AM2018-06-24T05:57:53+5:302018-06-24T05:58:00+5:30
आॅनलाइन क्राउडफंडिंगच्या माध्यमातून निधी संकलन, हे काही आता केवळ शहरी भागापुरते मर्यादित राहिलेले नाही.
कोल्हापूर : आॅनलाइन क्राउडफंडिंगच्या माध्यमातून निधी संकलन, हे काही आता केवळ शहरी भागापुरते मर्यादित राहिलेले नाही. इंटरनेट आणि मोबाइल सेवांच्या प्रसारामुळे निमशहरीच नव्हे, तर अगदी ग्रामीण भागातही वैयक्तिक, तसेच सामूहिक गरजांसाठी आॅनलाइन क्राउडफंडिंगच्या माध्यमातून निधी संकलन केले जात आहे. असेच एक उदाहरण पुढे आले आहे कोल्हापूरमधून.
कोल्हापूरपासून १५ किमी अंतरावर असलेल्या गडमुडशिंगी गावातले अशोक सोनुले आणि त्यांचे कुटुंबीय शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांच्या गावात दुष्काळ हा कायमचाच. या दुष्काळामुळेच सोनुले यांच्या पाव एकर जमिनीवर कधीच कोणते पीक उगवले नाही, पण यंदा मात्र त्या पाव एकरच्या तुकड्यावर ज्वारी चांगली उगवली. दुष्काळाच्या झळा जशा माणसांना बसतात, तशाच पक्ष्यांनाही बसतात, हे माहीत असल्यामुळे अशोक सोनुले यांनी त्यांच्या पाव एकरमधले ज्वारीचे पीक पक्ष्यांना मोकळे करून दिले, पण त्यांच्या लक्षात आले की, पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी कुठे सोयच उपलब्ध नाही. अशी सोय करण्यासाठी पैशांची गरज भासणार होती. बेटर इंडिया या संस्थेने अशोक सोनुले यांची ही गरज मिलाप या क्र ाउडफंडिंग पोर्टलवर प्रसिद्ध केली आणि म्हणता-म्हणता तब्बल ५0 हजार रुपये आॅनलाइन क्राउडफंडिंगच्या माध्यमातून उभे राहिले. या ५0 हजारांतून सोनुले यांनी शेतात बोअर विहीर बांधली. या विहिरीतले पाणी शेतात विविध ठिकाणी बादल्या आणि पातेल्यांमध्ये ठेवून सोनुले पक्ष्यांची तहान भागवत आहेत.
महागड्या शस्त्रक्रि यांसाठीचा वैद्यकीय खर्च, सामूहिक रोजगार निर्मितीसाठीचे प्रकल्प, शैक्षणिक उपक्र म, इतकेच नव्हे, तर ग्रामीण भागात बंधारे बांधणे, दुभती जनावरे विकत घेणे आदींसाठी गरजू लोक आॅनलाइन क्राउडफंडिंगचा मार्ग अनुसरत आहेत. सोशल मीडिया आणि नेटवर्किंगच्या जमान्यात गरजूंना मदत देण्यासाठी तयार असणारे अनेक ओळखीचे आणि अनोळखी लोक मित्र असू शकतात. त्यांना गरजू व्यक्तीशी जोडण्याचे काम क्र ाउडफंडिंग वेबसाइट करतात. याविषयी अधिक माहिती देताना मिलापचे संस्थापक मयुख चौधरी म्हणाले की, ‘गेल्या वर्षभरातच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विविध उपक्रमांच्या निधी संकलनासाठी आॅनलाइन क्र ाउडफंडिंगचा पर्याय चोखाळणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. ग्रामीण भागही डिजिटल झाल्यामुळे, गरजू लोकांना आपल्या गरजा जगभरातील लोकांपुढे मांडणे शक्य होत आहे, तर डिजिटल आर्थिक व्यवहार सुलभ झाल्यामुळे अशा गरजवंतांना मदत मिळणेही सुलभ झाले आहे.’ मिलाप या भारतातील आघाडीच्या क्र ाउडफंडिंग वेबसाइटने, गेल्या सात वर्षांत ३२९ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत गोळा करून, ती देशभरातील गरजूंना उपलब्ध करून दिली आहे. अतिदुर्गम ग्रामीण भागात जस जसा इंटरनेटचा प्रसार होईल, तसतसे आॅनलाइन क्र ाउडफंडिंगचे महत्त्व ग्रामीण भागात आणखी खोल झिरपत जाईल, असेही मयुख चौधरी यांनी सांगितले.