‘बेगोनिया’च्या नवीन जातीस मधुकर बाचूळकर यांचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:38 AM2019-11-23T00:38:09+5:302019-11-23T00:38:17+5:30

कोल्हापूर : पश्चिम घाटातील शोभिवंत वनस्पती बेगोनिया प्रजातींचा अभ्यास करताना कोल्हापुरातील ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव आणि ...

Madhukar Bachulkar's name for a new breed of Begonia | ‘बेगोनिया’च्या नवीन जातीस मधुकर बाचूळकर यांचे नाव

‘बेगोनिया’च्या नवीन जातीस मधुकर बाचूळकर यांचे नाव

Next

कोल्हापूर : पश्चिम घाटातील शोभिवंत वनस्पती बेगोनिया प्रजातींचा अभ्यास करताना कोल्हापुरातील ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव आणि छत्रपती शहाजी महाविद्यालयातील वनस्पती विभागप्रमुख डॉ. मकरंद मो. ऐतवडे यांना केरळमधील निलयमपत्ती, पलक्कड या ठिकाणी डिसेंबर २०१२ साली बेगोनियाची एक जात आढळून आली. या प्रजातीस वनस्पतितज्ज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांचे नाव देण्यात आले ‘बेगोनिया बाचूळकरी’ अशी या प्रजातीची ओळख असेल.
बेगोनिएसी कुळातील बेगोनिया या जातीतील वनस्पती जगभरात शोभिवंत वनस्पती म्हणून सर्वज्ञात आहेत. जगभरात बेगोनियाच्या १० हजार जाती लागवडीखाली आहेत. याबरोबरच त्यांचे अनेक जंगली, लागवडीखालील आणि संकरित वाण शोभिवंत, खाद्य आणि औषधी गुणधर्माचे आहेत. सर्व संदर्भांचा आढावा घेतल्यानंतर भारतासाठी बेगोनिएसी कुटुंबामध्ये बेगोनिया ही एकच प्रजात असून, त्यात साधारणपणे ६७ जाती नोंद आहेत, असे लक्षात येते. पश्चिम घाटातील बेगोनियाच्या जाती मर्यादित ठिकाणीच आढळतात. त्यातील बहुतांश जाती प्रदेशनिष्ठ आहेत, तर काही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत यादव व ऐतवडेकर यांनी सखोल अभ्यास केल्यानंतर ही जात ‘बेगोनिया फ्लोसिफेरा’ या जातीशी आप्तभाव दर्शविते असे आढळून आले. त्याबाबतचा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘फायटोटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये नुकताच प्रसिद्ध झाला.
‘बेगोनिया बाचूळकरी’ साधारणपणे ५०-६० सेंटीमीटर उंच असून, ती ओलसर ठिकाणी दमट हवामानात दगडांच्या फटींमध्ये वाढते. या वनस्पतीस जमिनीच्या वर खोड नसून ते रूपांतरित मूलक्षोड स्वरूपात जमिनीखाली आढळते. ही वनस्पती संकलित करण्यासाठी थ्रिसूर, केरळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद- राष्ट्रीय पादप आनुवंशिक संसाधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. जोसेफ कट्टुकुनेल यांची मदत झाली. या संशोधनामध्ये डॉ. शरद कांबळे, रोहित माने, जगदीश दळवी यांचे सहकार्य लाभले. डॉ. बाचूळकर यांनी गेली अनेक वर्षे वनस्पती वर्गीकरणशास्त्र, जैवविविधतेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण या क्षेत्रात काम केले आहे. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ‘बेगोनिया बाचूळकरी’ हे नाव देण्यात आहे, असे प्रा. यादव आणि डॉ. ऐतवडे यांनी सांगितले.

‘बेगोनिया बाचूळकरी’ची वैशिष्ट्ये
खोड जमिनीखाली रूपांतरित मूलक्षोड स्वरूपात, आकर्षक फुलोरे आणि गुलाबी फुले, मर्यादित ठिकाणीच अस्तित्व, फुले व फळे नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान येतात.

Web Title: Madhukar Bachulkar's name for a new breed of Begonia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.