नंदवाळमध्ये साध्या पद्धतीने माघी वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:26 AM2021-02-24T04:26:26+5:302021-02-24T04:26:26+5:30
सडोली (खालसा) : प्रतिपंढरपूर असणाऱ्या नंदवाळ येथील माघ वारीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने शासकीय नियमांचे पालन करून झाली. ...
सडोली (खालसा) : प्रतिपंढरपूर असणाऱ्या नंदवाळ येथील माघ वारीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने शासकीय नियमांचे पालन करून झाली. वारीसाठी येणारे हजारो भाविक, टाळ-मृदंगाच्या जयघोषाने दुमदुमून जाणारी नंदवाळ नगरी यावेळी मात्र भक्ताविना सुनीसुनी पडली होती.
नंदवाळ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी, कार्तिक, माघ, वारीला लाखो भाविक हजेरी लावतात; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नंदवाळ येथील माघ वारीसाठी एक दिवसासाठी बंदी घालण्यात आली होती. भाविकांनीही प्रशासनाने केलेल्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन घरातूनच नमस्कार केला. भाविकांनी शासकीय नियमांचे पालन केल्याने मंदिर परिसरात वैष्णवांच्या मेळा न भरल्याने टाळ-मृदंगाचा गजर व हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून जाणारी नंदवाळ नगरी सुनी होती. मंगळवारी पहाटे मंदिर समिती व मोजक्याच भाविकांच्या उपस्थित अभिषेक, महापूजा करण्यात आली. तसेच विणापूजन करून मंदिर बंद करण्यात आले.
इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फोटो ओळ १. नंदवाळ (ता. करवीर) येथील कार्तिक वारीवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली होती. त्यामुळे मंदिर पूर्ण पणे बंद करण्यात आले होते. यावेळी भाविक मंदिराच्या बाहेरून दर्शन घेत होते
२) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाची, रुक्मिणी, सत्यभामाची फुलांच्या माळांनी सजवलेली मूर्ती
फोटो : दिव्या फोटो, गाडेगोंडवाडी