जादूच्या प्रयोगात रमली बालमने...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:56 PM2018-09-09T23:56:10+5:302018-09-09T23:56:13+5:30
कोल्हापूर : आकर्षक विद्युत रोषणाई, संगीताचा ठेका आणि डोळ्याची पापणी लवते न लवते, तोपर्यंतच चमत्कारी जादूच्या प्रयोगांनी जादूगार विश्वसम्राट यांनी उपस्थित बालचमूंनाच थक्क केले. जादूच्या प्रयोगाच्या या मायाजालात तब्बल दीड तास बालकांची मने रविवारच्या दुपारी आनंदात रमली होती. निमित्त होते, ‘लोकमत बाल विकास मंच’च्या वतीने आयोजित विशेष जादूच्या प्रयोगाचे.
रविवारी राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनाच्या सभागृहात ‘लोकमत बाल विकास मंच’ सबस्क्रिप्शनर्ससाठी जादूई नगरीचे बेताज बादशाह जादूगार विश्वसम्राट यांच्या जादूच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन जादूगार विश्वसम्राट, फ्लाईग किडस्च्या इंद्रायणी पाटील, मदर केअर इंटरनॅशनल स्कूलचे प्रा. विकास येसादे व सखी मंच कमिटी मेंबर यांच्या हस्ते करण्यात आले.
रविवारच्या सुटीची धमाल; त्यामध्येच जादूचे दर्जेदार प्रयोग पाहण्याची अनोखी पर्वणी ‘बाल विकास मंच’च्या सबस्क्रिप्शनर्सना मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगणित झाला होता. जादूगार विश्वसम्राट यांनी स्पेशल लाईट इफेक्टच्या माध्यमातून दमदार एंट्री करताच मुलांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचे स्वागत केले.
जादूई नगरीचे बेताज बादशाह जादूगार विश्वसम्राट यांनी आपल्या अद्भुत प्रयोगाने सर्वांना आश्चर्यचकित केले. यामध्ये बॉक्समधील मुलाला गायब करून प्रेक्षकांत बसविणे, प्रेक्षकांतील
लहान मुलग्याला अचानक स्टेजवर आणणे, हवेत खुर्ची उडविणे असे अनेक जादूई प्रयोग करून त्यांनी आश्चर्याने मुलांना तोंडात बोट घालण्यास भाग पाडले. त्यांच्या प्रत्येक प्रयोगाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
जादू हे करमणुकीचे साधन
जादूगाराकडे कोणतीही दैवी शक्ती नसते. जादूचे प्रयोग म्हणजे विज्ञान व हातचलाखी यांचा सुरेख मिलाफ असतो. जादूच्या प्रत्येक प्रयोगामागे विज्ञान आहे. जादूकडे करमणूक म्हणूनच पाहावे, असे आवाहन उपस्थित बालचमूंना जादूगार विश्वसम्राट यांनी याप्रसंगी केले.
शेवटचे काहीच दिवस
बाल विकास मंचच्या सबस्क्रिप्शनच्या नोंदणीसाठी शेवटचे काहीच दिवस शिल्लक आहेत. नोंदणी करून २ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ‘फन फेअर’चा आनंद पालकांनी व मुलांनी घ्यावा. नोंदणी लोकमत कार्यालयात सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत सुरू आहे.
सभागृह हाऊसफुल्ल
दुपारी चार वाजता जादूचा विशेष प्रयोग सुरू होणार असला तरी साडेतीन वाजताच सभागृह हाऊसफुल्ल झाले.
यावेळी पालकांच्या मुलांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले.