बालमित्रांनी गिरविले जादूचे धडे
By admin | Published: May 19, 2015 11:46 PM2015-05-19T23:46:15+5:302015-05-20T00:10:51+5:30
‘लोकमत बालविकास मंच’ची कार्यशाळा : जादूगार गुरुदास कदम यांनी शिकविले प्रयोग
कोल्हापूर : टिकल्यांची करामत, डान्सिकल बॉटल, कॉईन मॅनेज करणे, आदी जादूच्या प्रयोगांचे धडे मंगळवारी बालमित्रांनी गिरविले. निमित्त होते ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे आयोजित ‘तुम्हीसुद्धा होऊ शकता जादूगार’ या जादूच्या प्रयोगांची कार्यशाळा. यात जादूगार गुरुदास कदम यांनी बालमित्रांना जादू शिकविली.जादूचे प्रयोग पाहणे हा आबालवृद्धांसाठी मनोरंजन व आनंददायी अनुभव असतो. अनेक लहान मुलांना या प्रयोगांबाबत उत्सुकता असते. त्यांना ते शिकण्याचीही इच्छा असते. ते लक्षात घेऊन जादूचे प्रयोग शिकण्याची संधी ‘लोकमत बालविकास मंच’ने बालमित्रांना उपलब्ध करून दिली. कोल्हापुरात अशा स्वरूपातील कार्यशाळा पहिल्यांदाच झाली. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनातील कार्यशाळेचे उद्घाटन जादूगार गुरुदास कदम यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांचे प्रतिमापूजन करून झाले. जादूगार गुरुदास कदम यांनी पहिल्यांदा ‘टिकल्यांची करामत’ ही जादू दाखविली. जादूच्या प्रयोगानंतर ते बालमित्रांना त्याची क्लृप्ती (ट्रिक्स) समजावून सांगत होते. ज्यांना ती क्लृप्ती समजत नव्हती, अशा मुला-मुलींमध्ये जाऊन, तसेच काहीजणांना व्यासपीठावर बोलावून ती क्लृप्ती ते परत दाखवीत होते.
दीड तासाच्या कार्यक्रमात बालमित्रांना समजेल अशा पद्धतीने जादूगार कदम यांनी डान्सिकल बॉटल, पत्त्यांवर ग्लास अधांतरी ठेवणे, दहा रुपयांच्या नोटेपासून वीस रुपयांची नोट तयार करणे, कॉईन मॅनेज करणे, दोरीची दोन टोके धरून गाठ मारणे हे प्रयोग व त्यांच्या क्लृप्त्या दाखविल्या. उपस्थित मुला-मुलींनी हे प्रयोग, क्लृप्त्या वहीमध्ये लिहून घेतल्या. इतक्या सहजपणे जादूचे प्रयोग करता येतात, हे पाहून बालमित्र भारावून गेले. (प्रतिनिधी)
हस्ताक्षर सुधारणा वर्गाचे आयोजन
खास ‘बालविकास मंच’च्या सदस्यांसाठी २७ व २८ मे रोजी हस्ताक्षर सुधारणा वर्ग आयोजित केला आहे. त्याबाबतच्या अधिक माहितीसाठी ‘लोकमत’ वाचत राहा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.