महापौरपदासाठी दादांची गुगली

By Admin | Published: November 11, 2015 12:54 AM2015-11-11T00:54:20+5:302015-11-11T00:54:44+5:30

‘भाजप-ताराराणी’ची बैठक : घोडेबाजार, धमक्यांना थारा नाही : चंद्रकांतदादा पाटील

Magistrate's googly | महापौरपदासाठी दादांची गुगली

महापौरपदासाठी दादांची गुगली

googlenewsNext

कोल्हापूर : ‘महापौर आमचाच होणार,’ असा दावा करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापौर आणि उपमहापौर या दोन्हीही पदांसाठी भाजप आणि ताराराणी या दोन्हीही पक्षांतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय गुगली टाकली. महापौर निवडणुकीत आम्ही घोडेबाजार करणार नाही, सत्ता आहे म्हणून कोणालाही धाक दाखविणार नाही, सद्सदविवेकबुद्धीला स्मरून आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता आणू, असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महापौर व उपमहापौरपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत भाजप आणि ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांची बैठक मंगळवारी दुपारी येथील एका हॉटेलवर घेण्यात आली. यावेळी महापौरपदासाठी सविता भालकर, गीता गुरव, मनीषा कुंभार, स्मिता माने, सविता घोरपडे यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून भाजपच्यावतीने सविता भालकर आणि उपमहापौरपदासाठी संतोष गायकवाड तसेच ‘ताराराणी’कडून स्मिता माने आणि उपमहापौरपदासाठी राजसिंह शेळके यांची नावे निश्चित करण्यात आली. याबाबतची घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, ‘ताराराणी’चे अध्यक्ष स्वरूप महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी महापौर सुनील कदम, सुहास लटोरे, सुनील मोदी हे उपस्थित होते.
या बैठकीत पालकमंत्री पाटील म्हणाले, कोणीही गंभीर होऊ नये कोणत्याही परिस्थतीत महापौर आमचाच होणार आहे. आज आम्ही डावपेचातील पत्ते खुले करणार नाही, केवळ प्रयत्न करू म्हणून उपयोग होणार नाही, ‘महायुती’च्या नगरसेवकांनीही यासाठी हालचाली करणे महत्त्वाचे आहे. येत्या सहा दिवसांत बाहेरगावी कोणीही जायचे नाही, ‘ताराराणी’चा महापौर झाला तरीही तो भाजपचा मानू, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यामुळे महापौर हा भाजप-ताराराणी आघाडीचाच करण्याचा संकल्प करू, यासाठी आध्यात्मिक शक्ती आपण वापरणार आहोत, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
या बैठकीला भाजप-ताराराणी आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर भाजप-ताराराणी आघाडीच्या चौघा उमेदवारांसह त्यांचे उमेदवारी अर्ज घेऊन विजयराव सूर्यवंशी, नीलेश देसाई, ईश्वर परमार, आशिष ढवळे, सत्यजित कदम हे महानगरपालिकेत गेले व तेथे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. (प्रतिनिधी)


खुर्चीचे राजकारण : विकासासाठी आटापिटा
काँग्रेस आघाडीला पूर्ण बहुमत असताना चंद्रकांतदादांचा उगाचच आटापिटा सुरू असल्याच्या सतेज पाटील यांच्या टीकेवर उत्तर देताना चंद्रकांतदादा म्हणाले, मग तुमचा आटापिटा कशासाठी? आमचा अटापिटा हा शहराच्या विकासासाठी आहे, केंद्र, राज्यातही भाजपची सत्ता असल्याने कोल्हापूर महानगरपालिकेतही भाजपची सत्ता आल्यास विकास निधीची कमतरता भासणार नाही. महापौर करण्याबाबत मी विरोधकांना अगर त्यांच्या नेत्यांना भेटलेलो नाही. मी राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्व पक्षांना आमचा महापौर करण्याबाबत साथ देण्याचे आवाहन केले आहे.

सतेज पाटील भलतेच चतुर
काँग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे भलतेच चतुर आहेत. त्यांनी प्रत्येक नगरसेवकांना दीपावली भेट म्हणून मिठाई पाठविली आहे. त्यामुळे ते साधे नाहीत, त्यांची मिठाई म्हणजेच हे महापौरपदासाठी काँग्रेसला मदत करण्याचे आमिष नगरसेवकांना दाखविले आहे, असेही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत सांगितले.

Web Title: Magistrate's googly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.