आशिया खंडातलं भव्य राजवैभव झाकोळलं!

By Admin | Published: April 16, 2015 11:18 PM2015-04-16T23:18:56+5:302015-04-17T00:13:24+5:30

चित्र-स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना : शासनाने लक्ष दिल्यास सातारच्या जुन्या राजवाड्याला मिळेल झळाळी--जागतिक वारसा दिन विशेष...

The magnificence of Asia clandestine! | आशिया खंडातलं भव्य राजवैभव झाकोळलं!

आशिया खंडातलं भव्य राजवैभव झाकोळलं!

googlenewsNext

प्रदीप यादव - सातारा  -सातारा जिल्ह्याला प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असा तिन्ही कालखंडाचा वैभवशाली ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यात १८२४ साली प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी राजवाडा बांधला. शेकडो लाकडी खांबांवर आपले राजवैभव मिरवित हा दुमजली राजवाडा आजही दिमाखात उभा आहे. विशेष म्हणजे लाकडीकाम असलेला आशिया खंडातील हा सर्वांत मोठा राजवाडा आहे. मात्र दोन शतकांपासून जास्त काळ आपले अस्तित्व टिकवून असलेला हा राजवाडा आता दुर्लक्षामुळे मोडकळीस आला आहे. दि. १८ रोजी जागतिक वारसा दिन साजरा करताना स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला हा ऐतिहासिक वारसा जतन होणे, गरजेचे बनले आहे.

शेकडो लाकडी खांबांवर उभा राजवाडा
सातारा उत्तर शिवकालीन मराठ्यांची राजधानी असल्याने या परिसरात सरदार व राजघराण्यांनी बांधलेले वाडे, गड, कोट साताऱ्याची आभूषणे आहेत. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी १८२४ मध्ये चौसोपी राजवाडा बांधला. सुमारे सहा एकरावर बांधलेला हा राजवाडा आशिया खंडातील सर्वांत मोठे लाकडीकाम असलेला वाडा आहे. चार चौक आणि सुमारे ५२ दालने असलेला हा राजवाडा बांधण्यासाठी त्याकाळी पाच लाख रुपयांचा खर्च आला होता.


नक्षीदार सागवानी खांब
सहा एकर क्षेत्रात पसरलेला हा राजवाडा चौसोपी व दुमजली आहे. यासाठी सागवानी लाकडांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला असून अजिंक्यतारा किल्ल्यावरील सागाचाच वापर यासाठी केला होता. राजवाड्याला अंबारीसह हत्ती प्रवेश करील असे भव्य व रेखीव प्रवेशद्वार आहे. बाजूला हत्तीखाना, घोड्यांचा पागाही आहे. सुंदर नक्षीकाम केलेल्या शेकडो लाकडी खांबांवर हे राजवैभव दिमाखात उभे आहे.

दरबार-ए-आम
राजवाड्यात दुसऱ्या मजल्यावर दरबार-ए-आम नावाची प्रशस्त जागा आहे. याठिकाणी महाराज रयतेची गाऱ्हाणी ऐकून घेत. आजही ही जागा सुस्थितीत आहे.


दरबार-ए-खास
दरबार-ए-आमच्या दुसऱ्या बाजूला ‘दरबार-ए-खास’ नावाची जागा असून याठिकाणी राजदरबार भरत असे. महिरप असलेले लाकडी खांब अजून याठिकाणी पाहायला मिळतात.

राणीवसा, शयनगृह
राजवाड्यातील स्त्रियांचे वास्तव्य असलेला राणीवसा, महाराजांचे शयनगृह आजही सुस्थितीत आहेत. राणीवसा दालनातून वाड्यात होणारे कार्यक्रम राजघराण्यातील स्त्रियांना पाहता येत असे.


शाळेमुळेच राजवाड्याचे अस्तित्व टिकून
संस्थान खालसा झाल्यानंतर १८७६ मध्ये या राजवाड्यात सातारा हायस्कूल सुरू झाले. पुढे त्याचे नाव प्रतापसिंह महाराज हायस्कूल झाले. आता राजवाड्याचे जे काही अस्तित्व शिल्लक आहे ते या शाळेमुळेच. सतत माणसांचा राबता असल्यामुळे आणि शिक्षकांच्या देखभालीमुळे राजवाड्याचा काही भाग वापरात आला आहे. या राजवाड्यानंतर सुमारे २० वर्षांनी आप्पा महाराजांनी शेजारीच १८४४ मध्ये नवीन राजवाडा बांधला. त्यात कोर्ट सुरू होते. कोर्ट येथून हलविले अन् नवा राजवाड्याची रयाच गेली. चोरट्यांनी राजवाड्याची लूट सुरू केल्याने फक्त अवशेष उरले आहेत.


राजवैभवाच्या खुणा जिवंत
राजवाड्याच्या बांधकामाला दोनशे वर्षे उलटून गेली मात्र अजूनही वाड्यातील काही गोष्टी सुस्थितीत आहेत. दरबार-ए-आम, दरबार-ए-खास, राणीवसा, मुपादखाना (स्वयंपाकघर), शौचकूप, पाण्याचे हौद, शयनगृह, नाचगाण्याच्या मैफलीचे मोठे चौक, कचेरीची जागा, भुयारी खजिना या गोष्टी आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत.




....तर पुन्हा मिळेल झळाळी
सध्या जुना राजवाड्याची पडझड सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रातील इतर राजवाड्यांच्या तुलनेत सातारचा राजवाडा सुस्थितीत आहे. वापरात असलेला भाग व्यवस्थित असून पाठीमागील काही भाग बंदिस्त आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे हा वाडा मोडकळीस आला आहे. लाकडांना वाळवी लागली आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शासनाने डागडुजीसाठी खर्च केला तर दोनशे वर्षांपूर्वीच्या राजवैभवाला पुन्हा झळाळी मिळेल.

दरवाजांच्या वर ललाटपट्टी
राजवाड्यातील आतील महत्त्वाच्या खोल्यांच्या दरवाजावर लाकडात कोरलेली गणेशमूर्ती दिसते. तिच्या बाजूला रेखीव नक्षीकामही आहे. याला ललाटपट्टी असे संबोधले जात असे.


राजवाडा, हत्तीखाना, नगारखाना,
जलमंदिर अन् गोजराबार्इंचा वाडा
प्रतापसिंह महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोर नगारखाना बांधला होता. एखादी अनूचित घटना घडल्यास नगारा वाजविला जात असे. सध्याच्या नगरवाचनालयाच्या जागेवर नगारखाना होता. तर सध्याच्या शिवाजी सभागृहाच्या जागेवर जुने जलमंदिर होते. प्रतापसिंह महाराजांनी आपली मुलगी गोजराबाई यांच्यासाठी वाडा बांधला होता. आर्याग्ल हॉस्पिटलच्या जागेवर हा वाडा होता. तर राजघराण्यातील महिलांसाठी दोन तलाव बांधले होते. सध्या त्याठिकाणी पालिकेचा पोहोण्याचा तलाव आहे.


राजवाड्यातील ऐतिहासिक घटना
प्रतापसिंह महाराजांनी इंग्रजांविरुद्ध लढाई न करता सत्यागृहाचा मार्ग अवलंबला. भारतातील पहिल्या सत्यागृहाची ही सुरुवात याच राजवाड्यातून झाली.
पुण्याच्या पेशव्यांची वस्त्रे साताऱ्यातील अदालत वाडा तसेच जुना राजवाड्यातून दिली जात असे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण याच वाड्यात सातारा हायस्कूलमध्ये झाले.

Web Title: The magnificence of Asia clandestine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.