‘स्वाभिमानी’चा ४ मे रोजी कर्जमुक्तीसाठी महामोर्चा
By admin | Published: April 14, 2017 11:02 PM2017-04-14T23:02:54+5:302017-04-14T23:02:54+5:30
राजू शेट्टी आक्रमक : ३३९ गावांमधून निघणार रॅली
कोल्हापूर : भाजपसोबत सत्तेत असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी कर्जमुक्तीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. ४ मे रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन केले आहे. त्याआधी पाच दिवस स्वाभिमानीचे २०० युवक जिल्ह्यातील ३३९ गावांमधून रॅली काढणार असून, या पाच दिवशी रात्री शेट्टी यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून जाणार आहे.
राजू शेट्टी जरी सत्तेत असले तरीदेखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी रोखठोक भूमिका घेत भाजप सरकारलाही टीकेचे लक्ष्य बनविले आहे.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होण्यासाठी त्यांनी आता प्रत्यक्ष भूमिका घेतली आहे.
कर्जमुक्ती बरोबरच, उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्यावा, शेतीपंपाला २४ तास वीजपुरवठा करावा, मायक्रो फायनान्सच्या जाचातून मुक्त करा, स्वामिनाथन कमिटीचा अहवाल त्वरित स्वीकारा यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतून ३३९ गावांमधून ११५० किलोमीटरची ही रॅली काढण्यात येणार आहे. खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि रविकांत तूपकर, प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे हे या सभांना उपस्थित राहणार आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि अन्य मागण्यांबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला; परंतु अजूनही शासनाने याबाबतीत निर्णय घेतलेला नाही. आम्ही जरी सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांची बाजू आम्हाला घ्यावीच लागेल.
त्यामुळे शेतकऱ्यांचा सात-बारा
कोरा करण्यासाठी हा महामोर्चा
आयोजित केला आहे आणि
तो ‘स्वाभिमानी’च्या स्टाईलनेच होईल.
- खासदार राजू शेट्टी, संस्थापक,
स्वाभिमानी शेतकरी संघटना