शाहू छत्रपतींना महाविकास आघाडीची 'ऑफर', भूमिका गुलदस्त्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 05:42 PM2024-02-22T17:42:35+5:302024-02-22T17:45:24+5:30
कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर मतदार संघातून महाविकास आघाडीची उमेदवारी घेऊन शाहू छत्रपतींनी निवडणूक लढवावी, अशी खुली ऑफर महाविकास आघाडीकडून ...
कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर मतदार संघातून महाविकास आघाडीची उमेदवारी घेऊन शाहू छत्रपतींनी निवडणूक लढवावी, अशी खुली ऑफर महाविकास आघाडीकडून दिली असली तरी दस्तुरखुद्द शाहू छत्रपती यांची भूमिका मात्र गुलदस्त्यात राहिली आहे. त्यामुळे कोल्हापुरातून आघाडीचे उमेदवार कोण असतील याबाबत उत्सुकता अधिक ताणली आहे.
कोल्हापूर दौऱ्यात मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू छत्रपती यांची दोन वेळा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पहिली भेट व चर्चा न्यू पॅलेसवर झाली. त्यानंतर माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनावेळी चर्चा केली. शिवाय लोकार्पण सोहळ्यातदेखील अप्रत्यक्षपणे शाहू छत्रपती यांनी प्रागतिक विचार पुढे नेण्यासाठी नेतृत्व करण्याचे आवाहन केले. त्यामुळे शाहू छत्रपती हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशा चर्चेला उधाण आले.
शाहू छत्रपती यांच्याशी चर्चा करताना पवार यांनी मोजक्या नेत्यांनाच बैठकीत घेतले होते. त्यामुळे नेमकी चर्चा काय झाली, पवार यांनी काय शब्द दिला, शाहू छत्रपती यांनी काय सांगितले, या गोष्टी बाहेर आलेल्या नाहीत; परंतु रात्री स्नेहभोजनानंतर शाहू छत्रपती निघून गेल्यानंतर शरद पवार यांनी सतेज पाटील, विजय देवणे, सुनील मोदी यांच्याकडून जिल्ह्यातील सध्याची राजकीय समीकरणे समजून घेतली. त्यामुळे शाहू छत्रपती यांनी नकार दिला तर पुढचा उमेदवार कोण, याची चाचपणी पवार यांनी केली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसचाही शाहू छत्रपती यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल असणार आहे. कारण मंगळवारी रात्री झालेल्या चर्चेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटीलदेखील चर्चेत सहभागी झाले होते. शिवाय शरद पवार यांनीच शाहू छत्रपती यांचे नाव सुचविले आहे, म्हटल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा आपल्या पक्षाच्या उमेदवाराबाबत फारसा आग्रह धरणार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे.
परंतु शाहू छत्रपती यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यांनी होकार अथवा नकारही दिलेला नाही. याबाबत थेट त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्यातील एकाही पक्षाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसताना माझ्या नावाची चर्चा होत आहे. चर्चा तर होणार आहे. आमची मंगळवारी चर्चा झाली. माझ्या होकारापेक्षा तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी पॉझिटिव्ह आहे. आधी ही जागा कोणाला जाणार, हे स्पष्ट झालेले नाही. ते निश्चित झाल्यावर उमेदवाराच्या नावावर चर्चा होईल.