‘महाआघाडी’त अध्यक्षपदाची लालसा आडवी
By admin | Published: March 4, 2016 01:02 AM2016-03-04T01:02:16+5:302016-03-04T01:07:45+5:30
गडहिंग्लज कारखाना निवडणूक : बैठकीत शिंदे-शहापूरकरांत चकमक; एकमेकांची उणीदुणी काढल्याने तणाव; सोमवारी पुन्हा बैठक
कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या विरोधातील महाआघाडीच्या रचनेत गुरुवारी ‘अध्यक्ष’पदाची लालसा आडवी आली. त्यामुळे विरोधी महाआघाडीची रचना अपूर्ण राहिली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सात, सात, पाच हा जागावाटपाचा दिलेला फॉर्म्युला झुगारून माजी अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे व डॉ. प्रकाश शहापूरकर हे बहुमतासाठीच्या जागेसाठी ठाम राहिले. परिणामी या दोघांत जागावाटपावर एकमत झाले नाही. या दोन मातब्बर नेत्यांना कारखान्याचे अध्यक्षपद आपल्याकडे हवे आहे. त्यामुळे बहुमत आपल्याकडेच असावे असे त्यांना वाटते. परिणामी सगळ््या घडामोडी बहुमताच्या आकड्याभोवतीच फिरत राहिल्या. येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक झाली.
बैठकीदरम्यान अॅड. शिंदे व डॉ. शहापूरकर यांनी कारखान्याच्या राजकारणाच्या इतिहासातील एकमेकांची उणीदुणी काढली. कुरघोडी करीत टोलेबाजी केली. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. सुमारे तीन तास बैठक चालूनही शेवटी एकमत झाले नाही; त्यामुळे महाआघाडीची रचना आणि जागावाटप यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सोमवारी (दि. ७) पुन्हा पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीमध्ये येथील शासकीय विश्रामगृहात बैठक होणार आहे.
कारखान्याच्या १९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. २७ मार्चला मतदान होणार आहे. सध्या कारखाना राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात आहे. मुश्रीफ यांना रोखण्यासाठी महाआघाडी करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीच्या सुरुवातीला पालकमंत्री पाटील म्हणाले, कारखान्यांच्या राजकारणात मला रस नाही. मात्र, सध्याची कारखान्यातील मुश्रीफ प्रवृत्ती रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे डॉ. शहापूरकर व अॅड. शिंदे यांनी प्रत्येकी सात जागा घ्याव्यात. उर्वरित पाच जागा शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना सोडाव्यात. या फॉर्म्युल्यावर एकमत करून महाआघाडी करावी. मी पूर्ण ताकदीनिशी मदत करीन. तुम्ही एकमेकांत भांडत बसला तर अडचणीत याल.
पालकमंत्री पाटील यांनी हा फॉर्म्युला दिल्यानंतर अॅड. शिंदे व डॉ. शहापूरकर यांनी काहीवेळ जागांसंबंधी स्पष्टपणे आपली भूमिका उघड केली नाही. डॉ. शहापूरकर ‘ये नहीं चलेगी,’ ‘मागचा इतिहास वाईट आहे,’ अशी सूचक टोलबाजी करीत होते. एकमत न झाल्याने अर्ध्या तासाने पालकमंत्री पाटील हे ‘तुम्हीच जागावाटपाचे गणित जुळवा’ असे म्हणून उठून गेले. काही वेळानंतर मध्येच उठून गेलेले पालकमंत्री पाटील पुन्हा आले. त्यावेळी डॉ. शहापूरकर यांनी ‘माझ्या गटाला बारा जागा हव्यात,’ असे सांगितले. शिंदे यांनी किती जागा हव्यात हे स्पष्ट केले नाही तरी बहुमताची संख्या हवी, असे सुचविले. एकत्र बसून एकमत झाले नाही. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी शहापूरकर, शिंदे, शिवसेनेचे विजय देवणे, संग्राम कुपेकर, भाजपचे बाबा देसाई, काँग्रेसचे (कै. राजकुमार हत्तरकी गट) उदय देसाई, वरदशंकर वरदापगोळ, मलगोंडा पाटील यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेतली. त्यानंतरही शहापूरकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले; पण जाता-जाता शहापूरकर यांनी बारामधील दोन जागा घटकपक्षांना सोडण्याची तयारी दर्शविली. कोणत्याही ठोस निर्णयाविनाच बैठक संपली.
बैठकीस जिल्हा परिषदेचे सदस्य संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणपतराव डोंगरे, सुभाष शिरकोळे, अॅड. बाळासाहेब पाटील, वरदशंकर वरदापगोळ, अनिल खोत, विजय मगदूम, दिलीप माने यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.