महापालिकेत होणार ‘महाभरती’
By admin | Published: August 10, 2016 12:36 AM2016-08-10T00:36:18+5:302016-08-10T01:11:33+5:30
पी. शिवशंकर : २५ पदे सरळ सेवेद्वारे भरणार; अभियंत्याच्या १७ पदांचा समावेश
कोल्हापूर : एक-एक अधिकाऱ्यांकडे तीन-चार पदांचा कार्यभार असल्याने कामांचा उठाव म्हणावा तितक्या गतीने होत नाही, ही बाब लक्षात घेऊन येत्या दोन महिन्यांत अधिकाऱ्यांची रिक्त असलेली २५ पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. सरळ सेवा भरतीची परीक्षा अधिक पारदर्शक व्हावी म्हणून ‘महाआॅनलाईन’ माध्यमातून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकाच अधिकाऱ्यांवर दोन-तीन खात्यांचा कार्यभार सोपवून त्यांच्यामार्फत कामकाज चालविले जात आहे; परंतु असे केल्याने कामाची निर्गत लवकर न होता ती प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामाची गती मंदावली आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आयुक्त शिवशंकर यांनी रिक्त असलेली अधिकाऱ्यांची ‘वर्ग १’ व ‘वर्ग २’ची पदे तसेच कनिष्ठ अभियंत्यांची पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे.
कनिष्ठ अभियंता यांची १७ पदे भरली जाणार आहेत, तर कामगार अधिकारी, उपशहर अभियंता, पर्यावरण अभियंता, वर्कशॉप सहायक अभियंता, जनसंपर्क अधिकारी या पदांचाही त्यामध्ये समावेश आहे. सध्या प्रशासन या पदांसाठीची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा निश्चित करून स्थायी समितीकडून मान्यता घेण्याची प्रक्रिया पार पाडत आहे.
महानगरपालिकेत बऱ्याच दिवसांनी महत्त्वाची आणि जबाबदारीची पदे भरली जात असल्याने भरतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली जावी, कोणावर अन्याय होऊ नये म्हणून ‘महाआॅनलाईन’ या शासकीय यंत्रणेचा वापर करून ती घेण्यात येणार आहे. भरतीसाठी अर्ज मागविण्यापासून ते परीक्षेपर्यंत आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रश्नपत्रिका मात्र महानगरपालिका प्रशासन तयार करेल. ही प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे.
सहायक आयुक्तपदाचा उमेश रणदिवे यांनी राजीनामा दिला असल्याने त्यांची रिक्त जागा प्रतिनियुक्तीद्वारे भरली जाणार असून, नगरविकास विभागाकडे तसा प्रस्ताव देण्यात आला आहे. ही सहायक आयुक्तपदाची जागा मागासवर्गीय उमेदवारासाठी राखीव ठेवायची असल्याने त्याच प्रवर्गातील अधिकारी द्यावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे. के.एम.टी.साठी अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक पदासाठीही एक अधिकारी प्रतिनियुक्तीवर मागितला आहे.