महापौरपदी माधवी गवंडी-: निवडीचा आनंद मात्र भाजप-ताराराणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:23 AM2019-06-29T01:23:55+5:302019-06-29T01:25:01+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिवसभरातील नाट्यपूर्ण घडामोडींनंतर कोल्हापूरच्या महापौरपदी माधवी प्रकाश गवंडी यांची बिनविरोध निवड झाली. विरोधातील भाजप-ताराराणी आघाडीने त्यांना हवा तो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्याने ही निवडणूक लढविली नाही.

Mahadarpadi Madhavi Gawandi | महापौरपदी माधवी गवंडी-: निवडीचा आनंद मात्र भाजप-ताराराणीला

महापौरपदी माधवी गवंडी-: निवडीचा आनंद मात्र भाजप-ताराराणीला

Next
ठळक मुद्दे पक्षांतर्गत शह-काटशह -दोन महिन्यांसाठी संधी; नाट्यपूर्ण घडामोडीनंतर निवड

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिवसभरातील नाट्यपूर्ण घडामोडींनंतर कोल्हापूरच्यामहापौरपदी माधवी प्रकाश गवंडी यांची बिनविरोध निवड झाली. विरोधातील भाजप-ताराराणी आघाडीने त्यांना हवा तो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्याने ही निवडणूक लढविली नाही. महापालिकेच्या २ जुलैला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत गवंडी यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. गवंडी यांना दोन महिन्यांसाठी ही संधी मिळेल.

महापालिकेचे सभागृह ८१ सदस्यांचे असून त्यामध्ये दोन्ही काँग्रेसच्या ४४ संख्याबळासह स्पष्ट बहुमत आहे. शिवाय शिवसेनेचे चार सदस्यही सत्तारूढ गटाबरोबर आहेत. दोन्ही काँग्रेसअंतर्गत ठरलेल्या सत्तेच्या फॉर्म्युल्यानुसार एक वर्षासाठी राष्ट्रवादीकडे महापौरपद आले होते. त्यातील सहा महिने सरिता मोरे यांना पक्षाने संधी दिली. त्यावेळी पक्षाचे माजी शहराध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ यांचे समर्थक राजू लाटकर यांच्या पत्नी अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांना संधी द्यायचे ठरले होते; परंतु माजी खासदार धनंजय महाडिक यांनी लाटकर यांच्या उमेदवारीस तीव्र विरोध केला. कारण लाटकर यांनी लोकसभा निवडणुकीत महाडिक यांच्याविरोधात उघड प्रचार केला होता. त्यामुळे लाटकर यांना उमेदवारी दिल्यास भाजप-ताराराणीने निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते.

लाटकर यांना राष्ट्रवादीमधूनच जास्त विरोध होता; परंतु तरीही मुश्रीफ हे त्यांच्या पाठीशी असल्याने लाटकर यांनाच संधी मिळेल, असे वातावरण दुपारपर्यंत होते. परंतु उमेदवार बदलला तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते, अशी भूमिका भाजप-ताराराणी आघाडीने घेतल्याने लाटकर यांच्याऐवजी गवंडी यांना पक्षाने संधी दिली. त्या आपल्याला उमेदवारी मिळणार नाही म्हणून नाराज होऊन घरी जाऊन झोपल्या होत्या. त्यांना उठवून आणून उमेदवारी अर्ज भरण्यात आला. महापालिकेच्या पंचगंगा तालीम प्रभागातून त्या निवडून आल्या आहेत.

महाडिकांचा जय, मुश्रीफांचा विसर !
माधवी गवंडी यांना महापौरपदाची संधी मिळाल्याचा आनंद दोन्ही काँग्रेसपेक्षा भाजप व ताराराणी आघाडीच्या सदस्यांना जास्त झाला. नियोजित महापौैरांचे पती प्रकाश गवंडी यांची गळाभेट घेण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ताराराणी आघाडीच्या सदस्यांच्या उड्या पडल्या. महापालिकेच्या राजकारणातही माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयाच्या घोषणांनी महापालिका चौक दणाणून गेला; परंतु गवंडी यांना ज्यांनी महापौर केले, त्या मुश्रीफ यांचा जयजयकार मात्र कुणीच केला नाही. राष्ट्रवादीतील मुश्रीफ विरुद्ध महाडिक या राजकारणाचा त्याला रंग होता.

राजू लाटकर समर्थकांचा गोंधळ
राजू लाटकर यांना उमेदवारी मिळण्याची आशा दिवसभरातील घडामोडींमुळे पल्लवित झाल्या होत्या; पण माधवी गवंडी यांची घोषणा झाल्यानंतर गटनेते कार्यालयात सन्नाटा पसरला. हे लाटकर समर्थकांना सहन न झाल्याने त्यांनी गटनेता कार्यालयाबाहेर गोंधळ माजविला.


साहेबांनी शब्द न पाळल्याचे दु:ख --लाटकर
कोल्हापूर : राजू पुढच्यावेळी मी लाटकर वहिनींना महापौर करतो, असा शब्द आमदार हसन मुश्रीफ यांनी माझ्या घरी येऊन दिला होता. त्याला भैया माने, प्रवीण भोसले हे साक्षीदार आहेत. तो शब्द त्यांनी पाळला नाही, याचे दु:ख वाटत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी व्यक्त केली आहे. मुश्रीफसाहेब यांच्यावर असा कोणता व कुणी दबाव आणला, याचे कोडे मलाही उलगडले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. लाटकर म्हणाले, ‘राष्ट्रवादीतून यापूर्वी हसिना फरास यांना महापौरपदाची संधी दिली, तेव्हा हे पद त्यांना सहाच महिन्यांसाठी दिले होते. नगरसेवक जिथे थांबले होते, तिथे स्वत: मुश्रीफ यांनीही स्पीकर फोनवरून तसे जाहीर केले होते; परंतु प्रत्यक्षात त्यांना वर्षभर संधी दिली गेली. त्याचवेळी सहा महिन्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला असता, तर गवंडी किंवा अनुराधा खेडकर यांना संधी मिळू शकली असती; परंतु पक्षाने त्यावेळी हा विचार केला नाही. त्यावेळी त्यांना पुन्हा सहा महिने मुदतवाढ द्या म्हणून कोण नगरसेवक सांगायला गेले नव्हते. ज्यांना नेतृत्वाने वर्षभर सत्तेची संधी दिली, त्यांचाच मुलगा पक्षाविरोधात गटबाजी करायला पुढे होता.’

Web Title: Mahadarpadi Madhavi Gawandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.