महादेव पाटील यांची सेवा प्रेरणा देणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:17 AM2021-06-10T04:17:29+5:302021-06-10T04:17:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : सहायक फौजदार महादेव लहू पाटील यांची जोतिबावरील एक दशकाची निष्काम सेवा पोलीस दलाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : सहायक फौजदार महादेव लहू पाटील यांची जोतिबावरील एक दशकाची निष्काम सेवा पोलीस दलाला प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन शाहूवाडी विभागाच्या प्रभारी पोलीस उपअधीक्षक पद्मजा कदम यानी केले.
कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. फौजदार महादेव पाटील यांचा सेवानिवृत्तनिमित्त सपत्नीक सत्कार पोलीस उपअधीक्षक पद्मजा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी कोडोलीचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशिद होते.
महादेव पाटील यानी पोलीस दलात ३६ वर्षे निष्कलंक सेवा केली. त्यातील अखेरची दहा वर्ष (एक दशक) कोडोली पोलीस ठाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लोकदैवत श्री जोतिबा तीर्थक्षेत्राच्या दरबारी सुरक्षेसाठी सेवा केली. मूळचे करवीर तालुक्यातील सडोली खालसा गावचे सुपुत्र पोलीस दलाच्या माध्यमातून जोतिबा डोंगरावरचा सर्वांचा हक्काचा माणूस, कष्टाळू, प्रामाणिक, जोतिबावर नितांत श्रद्धा, तेवढाच चांगला लोकसंपर्क असलेला पोलीस अंमलदार म्हणून त्यांची ओळख होती.
या वेळी डीवायएसपी पद्मजा कदम व सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशिद यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार केला. प्राचार्य लाडगांवकर, पत्रकार दिलीप पाटील यानी मनोगत व्यक्त केले. फौजदार सागर पवार, सहा.फौजदार, हवालदार, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. होमगार्ड रोहित माने यानी सूत्रसंचालन करून आभार मानले.
फोटो ओळी -जोतिबा डोंगर येथे कायम बंदोबस्तासाठी असणारे कोडोलीचे सहा. फौजदार महादेव पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सपत्नीक सत्कार शाहूवाडीच्या पोलीस उपअधीक्षक पद्मजा कदम व सपोनि. दिनेश काशिद यांच्या हस्ते झाला. सोबत पीएसआय सागर पवार.