महादेवराव महाडिक दुसरे ‘मुक्त’ विद्यापीठ मुश्रीफ : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटला विरोधच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:43 AM2018-07-31T00:43:20+5:302018-07-31T00:43:54+5:30
कोल्हापूर : सहकारी साखर कारखान्यांना परवानगी नसल्यानेच महादेवराव महाडिक यांच्या ‘बेडकीहाळ’ येथील कारखान्याप्रमाणे मी संताजी घोरपडे कारखाना उभारला. गोकुळ दूध संघ दूध संस्थांच्या मालकीचा राहावा, याच हेतूने मी बहुराज्य नोंदणीला विरोध केला; पण चंद्रकांत पाटील यांच्यानंतरचे महाडिक हे जिल्ह्यातील दुसरे मुक्तविद्यापीठ आहे. त्यांच्यासमोर मी छोटा माणूस आहे, असा उपरोधिक टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत लगावला.
दूध संघातील नोकरभरती, मल्टिस्टेट याबाबत आपली भूमिका काय? याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील दूध संस्थांचा हक्क अबाधित राहावा, कर्नाटकातील दीड-दोन हजार संस्था सभासद केल्या, तर येथील संस्थांचे महत्त्व कमी होईल. यासाठी माझा मल्टिस्टेटला विरोध आहे आणि कायद्याने जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट करता येत नाही. एम. टी. सरनाईक यांनी संघाची स्थापना केली, आनंदराव पाटील-चुयेकर यांनी संघ वाढविला. सरकारची अब्जावधीची मालमत्ता संघाला फुकटात मिळाली आहे. एनडीडीबी व शासकीय योजनांचे फायदे घेतल्याने बिंदूनामावलीनुसार भरती प्रक्रिया राबवायला हवी होती.
नोकरभरतीला सतेज पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुश्रीफ म्हणाले, शासनाची परवानगी घेऊन अशा प्रकारे सातारा, पुणे, अहमदनगरसह पाच जिल्हा बॅँकांनी केलेली नोकरभरती उच्च न्यायालयाने रद्द ठरविली होती. तुमचीच माणसे घ्या, पण वर्तमानपत्रात जाहिरात देऊन, परीक्षा, मुलाखती घेऊन बिंदूनामावलीप्रमाणेच भरती केली पाहिजे होती, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
‘गोकुळ’चा मी नेता, मग वाटा कोठे आहे?
‘गोकुळ’च्या सत्तारूढ गटाचा मी नेता असल्याने थोडा संयम बाळगण्याचा सल्ला महाडिक देतात. खरंच जर मी सत्तारूढ गटाचा नेता आहे, तर नोकरभरतीत माझा वाटा कोठे आहे, आतापर्यंत मला वाटणीही दिलेली नाही. असली वाटणी मला नकोच, असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.
शहाणी माणसे अशी भरती करणार नाहीत
‘गोकुळ’च्या नेत्यांसह संचालकांनी केलेल्या नोकरभरतीने आश्चर्यचकित झालो. लोकसभा, विधानसभा तोंडावर असताना अशा प्रकारे भरती कशी केली. काहीजण स्वत:, काहींचे मुले, भाऊ, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, अशावेळी भरती करणे धोक्याची घंटा आहे. त्याचा फटका बसू शकतो. कोणताही शहाणा माणूस अशा प्रकारची भरती करणार नाही, ते माझ्याशी बोलले असते तर सल्ला दिला असता, असा टोमणाही मुश्रीफ यांनी यावेळी लगावला.