आमदार महाडिक यांची पुन्हा ‘गुगली’

By admin | Published: December 11, 2015 01:10 AM2015-12-11T01:10:04+5:302015-12-11T01:14:33+5:30

विधानपरिषदेचे राजकारण : इचलकरंजीवर केले लक्ष केंद्रित; आवाडेंसह शविआच्या पाठबळासाठी प्रयत्न

Mahadik again gets 'googly' | आमदार महाडिक यांची पुन्हा ‘गुगली’

आमदार महाडिक यांची पुन्हा ‘गुगली’

Next

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माजी मंत्री प्रकाश आवाडे हे माघार घेणार नसतील तर त्यांना पाठिंबा देण्याची माझी तयारी असल्याचे गुरुवारी इचलकरंजीत जाहीर करून आमदार महादेवराव महाडिक यांनी पुन्हा एकदा राजकीय गुगली टाकली आहे. आवाडे हे माघार घेणार आहेत, हे महाडिक यांना पक्के माहीत आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठीच महाडिक यांनी अशी भूमिका घेतली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने आमदार महाडिक यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी तातडीने गडहिंग्लजला जाऊन श्रीपतराव शिंदे यांची भेट घेतली. गुरुवारी त्यांनी इचलकरंजीत जाऊन आवाडे यांच्यासह धृवती दळवाई यांचीही भेट घेतली. आवाडे यांच्यासाठी त्यांनी माघार घेण्याची तयारी दर्शविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या; परंतु त्यामागेही महाडिक यांचे राजकारण आहे. उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेतही त्यांनी असाच डाव टाकला होता. महाडिक, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आवाडे या तिघांपैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी चालेल; परंतु सतेज पाटील यांना ती देऊ नका, अशी मोट त्यांनी अगोदर मांडली. पी. एन. अथवा आवाडे यांना उमेदवारी मिळाल्यास आपण त्यांना पाठिंबा देऊ, असेही ते सांगत होते; कारण त्यांना सगळ्यांत अगोदर हे माहीत होते की, ही उमेदवारी जशी आपल्याला मिळत नाही, तशीच ती या दोघांनाही मिळत नाही. त्यामुळे जी गोष्ट घडणार नाही, ती मी तुमच्यासाठी करून दाखवितो, असे सोयीचे राजकारण त्यामागे होते. आताही त्याचाच पुढचा अंक त्यांनी सुरू केला आहे.
इचलकरंजी नगरपालिकेत तब्बल ६२ मते आहेत. पालिकेची पुढील वर्षी निवडणूक आहे. मुळातच या नगरपालिकेच्या राजकारणात इतकी बजबजपुरी आहे की तिथे कुणाचा पायपोस कुणाला नाही. त्यामुळे पक्षीय अथवा नेत्याबद्दलच्या निष्ठा ही गोष्टच तिथे गौण आहे. तिथे जो काही प्रभाव चालेल तो आर्थिकच.
त्यामुळेच महाडिक यांनी या मतांवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. इचलकरंजीतून आवाडे यांचे पाठबळ व जयसिंगपुरातून राजेंद्र यड्रावकर यांची मदत झाली तर आपले गणित जमू शकते, असा महाडिक यांचा होरा आहे.


पवार यांच्या भेटीचे प्रयत्न
महाडिक यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर फारच भिस्त आहे. त्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पातळीवरही त्यांच्याकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. गुरुवारी पवार यांचा अमृतमहोत्सवानिमित्त दिल्लीत सत्कार समारंभ होता. त्यासाठी धनंजय महाडिक उपस्थित राहणार होते. ते त्यावेळी यासंबंधी पवार यांच्याशी बोलणार असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत होते.


सतेज यांचे आवाडेंच्या माघारीसाठी प्रयत्न
कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीतून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी माघार घ्यावी, यासाठी काँग्रेसचे या निवडणुकीतील उमेदवार सतेज पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी त्यांनी बुधवारी अर्ज दाखल केल्यानंतर लागलीच मुंबई गाठली आहे.
आज, गुरुवारी ते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ते भेटणार होते. पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी व त्याचवेळेला आवाडे यांच्या माघारीसाठी विनंती करण्यात येणार होती परंतु प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सव सोहळ््यास गेले असल्याचे सांगण्यात आले. सतेज पाटील हे देखील या सोहळ््यास उपस्थित राहण्यासाठी दिल्लीस रवाना झाल्याने स्थानिक पातळीवर फारशा राजकीय घडामोडी नव्हत्या. या निवडणुकीतील माघारीची मुदत शनिवारपर्यंत आहे. महाडिक यांच्यासह अन्य कोण-कोण रिंगणात राहतात हे पाहूनच निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू होईल.


एक बॅच सहलीवर
शिरोळ तालुक्यातील एका नगरपालिकेतील निवडक नगरसेवकांची पहिली बॅच सहलीवर नेण्यात आल्याचे समजते. माघार झाल्यावर रविवारपासून इतर सदस्यांना सहलीवर नेण्याचे नियोजन सुरू आहे. २७ ला मतदान आहे. त्यामुळे हे सर्व नगरसेवक ‘दक्षिण भारत यात्रा’ करून २६ डिसेंबरला रात्रीच कोल्हापुरात येतील. दुसऱ्या दिवशी मतदान केल्यानंतरच त्यांची सुटका होईल.

Web Title: Mahadik again gets 'googly'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.