‘कोल्हापूर केसरी’साठी सतेज विरुद्ध महाडिक

By admin | Published: December 27, 2015 01:06 AM2015-12-27T01:06:39+5:302015-12-27T01:32:35+5:30

विधान परिषदेसाठी आज मतदान : दोन्ही गटांचे मतदार सकाळी आठ वाजता मतदान केंद्रांवर येणार, तुल्यबळ लढतीने राजकारण ढवळले

Mahadik against Satge for 'Kolhapur Kesari' | ‘कोल्हापूर केसरी’साठी सतेज विरुद्ध महाडिक

‘कोल्हापूर केसरी’साठी सतेज विरुद्ध महाडिक

Next

कोल्हापूर : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची लढत अजून लांब असली तरी कोल्हापूरच्या राजकारणातील बंदा कोण, हे ठरविणारी कोल्हापूर केसरीची लढत आज रविवारी होत आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज, रविवारी जिल्ह्यातील बारा केंद्रांवर सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे.
काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांचे सहलीवर गेलेले मतदार पुण्यात, तर आमदार महादेवराव महाडिक यांचे मतदार कऱ्हाड येथून सकाळी आठ वाजता थेट मतदान केंद्रांवर दाखल होणार आहेत. मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होऊन उचलाउचली झाल्याने मतदान केंद्रांवर तणावाचे वातावरण असणार, हे निश्चित आहे. या निवडणुकीसाठी एकूण ३८२ मतदार असून, मतमोजणी बुधवारी (दि. ३०) येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये होणार आहे.
काँग्रेसकडून सतेज पाटील तर भाजप पुरस्कृत आमदार महादेवराव महाडिक अशीही तुल्यबळ लढत होत आहे. जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणारी ही लढत आहे.
सतेज पाटील यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांच्यासह माजी मंत्री प्रकाश आवाडे आदींनी ताकद पणाला लावली आहे. व्यक्तिगत पाटील यांच्या कुटुंबातील त्यांचे ज्येष्ठ बंधू संजय डी. पाटील, ऋतुराज पाटील व स्वत: डॉ. डी. वाय. पाटील यांनीही कंबर कसली आहे.
आमदार महाडिक यांनीही आजपर्यंतची राजकीय कारकीर्द या निवडणुकीत पणाला लावली आहे. महाडिक स्वत:, पत्नी मंगल, पुतण्या खासदार धनंजय, मुलगा आमदार अमल आणि स्वरुप हेही सक्रीय झाले आहेत. महाडिक यांना भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांना विजयी करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मोहीम राबवत आहेत. विधानपरिषदेत भाजप अल्पमतात आहे. तिथे पक्षाचे बहुमत हवे असेल तर एकेक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वानेही ही लढत प्रतिष्ठेची केली. दोन्ही बाजूकडून विजय आमचाच असा दावा केला जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला कोण निवडून येणार याबद्दल उत्सुकता आहे. सभारंभातही याचीच चर्चा आहे. दोन्ही बाजू मतदारांसाठी पाण्यासारखा पैसा वाहत आहे. आज, रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून जिल्ह्यांतील बारा मतदान केंद्रावर मतदान होत आहे. या निवडणुकीत एकूण ३८२ मतदार असून त्यातील कोल्हापूर व हातकणंगले केंद्रावर प्रत्येकी ९३, त्या खालोखाल शिरोळमध्ये ५३ मतदान आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनानेही या तिन्ही ठिकाणी लक्ष केंद्रीत केले आहे.
शनिवारी मतदान केंद्रांवरील शासकीय कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देऊन बंदोबस्तात केंद्रांवर पाठविले. दरम्यान, उद्योगभवन येथील केंद्रावर पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी भेट देऊन त्यांना सूचना दिल्या आहेत.
बुधवारी दुपारपर्यंत फैसला समजणार
विधान परिषदेसाठी बुधवारी (दि.३०) सकाळी आठ वाजल्यापासून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. तीन टेबलांवर ही मोजणी प्रक्रिया राबविली जाणार आहे. दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mahadik against Satge for 'Kolhapur Kesari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.