महाडिक-बंटी, आवाडे-आवळे वादात दोषी धरण्यातच आयुष्य संपले : पी. एन. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:51 AM2019-03-04T11:51:34+5:302019-03-04T11:57:35+5:30
कोल्हापूर : कॉँग्रेस जिल्हाध्यक्षपदाच्या वीस वर्षांच्या कालावधीत महादेवराव महाडिक- सतेज (बंटी) पाटील, प्रकाश आवाडे-जयवंतराव आवळे, बजरंग देसाई-दिनकरराव जाधव यांच्यासह ...
कोल्हापूर : कॉँग्रेस जिल्हाध्यक्षपदाच्या वीस वर्षांच्या कालावधीत महादेवराव महाडिक- सतेज (बंटी) पाटील, प्रकाश आवाडे-जयवंतराव आवळे, बजरंग देसाई-दिनकरराव जाधव यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील वादाला मलाच दोषी धरण्यात आले. यामुळे माझे राजकीय नुकसान झालेच; पण दोषी धरण्यातच माझे आयुष्य संपल्याची सल कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी बोलून दाखविली.
प्रदेश कॉँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पी. एन. पाटील यांचा सत्कार रविवारी कॉँग्रेस कमिटीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे बोलत असताना ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पासो खोचगे यांनी त्यांना रोखले. ‘तासात एक बोलता, जिल्हा परिषदेची सत्ता कोणामुळे गेली?’ असा सवाल केल्याने कॉँग्रेस कमिटीतील वातावरण तणावपूर्ण बनले.
पक्षांतर्गत गटबाजीवर बोट ठेवत माजी मंत्री जयवंतराव आवळे म्हणाले, ‘कॉँग्रेसचा पराभव करण्याची हिंमत शिवसेना-भाजपमध्ये नाही. आम्हीच एकमेकांच्या पायात पाय घातल्याने जिल्ह्यात एकही आमदार नाही.
आवाडे आणि आम्ही हातात हात घालून काम करण्याचे ठरवले आहे. हाच धागा पकडत प्रकाश आवाडे म्हणाले, नेत्यांमधील मतभेद मिटले असून पक्षसंघटना मजबूत करणार आहे. कोणीच पायात पाय घालण्याचे राजकारण करणार नाही.’ आवाडे यांना मध्येच रोखत ‘तासात एक बोलता, जिल्हा परिषदेची सत्ता तुमच्यामुळेच गेली,’ अशी विचारणा ज्येष्ठ कॉँग्रेस कार्यकर्ते आप्पासो खोचगे यांनी केल्याने तणाव निर्माण झाला.
प्रकाश आवाडे यांनी तितक्याच संयमाने उत्तर देत, ‘मने मोकळी झाली पाहिजेत.’ असे ते म्हणाले. विचारल्याबद्दल खोचगेंचे कौतुक करत, ‘जिल्हा परिषदेत सत्ता का आली नाही हे जयवंतराव आवळे व पी. एन. पाटील यांना विचारा.
माझे आयुष्य कॉँग्रेसमध्ये गेले असताना राहुल आवाडेंना पक्षाची उमेदवारी डावलली जाते, त्यावेळी काय वाटले असेल? पण तेही विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आत एक, बाहेर एक आपण कधीच बोलत नसल्याचे सांगत बाजीराव खाडे दिल्लीत, पी. एन. पाटील मुंबईत, सतेज पाटील विधान परिषदेत आणि आपण जिल्ह्यात आहे, सगळे मिळून विरोधकांची भट्टी लावूया,’ असे आवाहन आवाडे यांनी केले.
पी. एन. पाटील म्हणाले, कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची वीस वर्षे आवाडे-आवळे, महाडिक-सतेज पाटील, बजरंग देसाई-दिनकरराव जाधव, उदयसिंगराव गायकवाड-संजीवनीदेवी गायकवाड, विक्रमसिंह घाटगे-संजय घाटगे यांच्यातील वादाला मलाच दोषी धरले.
यामुळे माझे राजकीय नुकसान झाले असून दोषी धरण्यातच माझे आयुष्य संपले. ‘प्रकाशअण्णा, राहुलला उमेदवारी मी नाकारली नाही. इचलकरंजी नगराध्यक्षपद आवळेंना हवे होते, पण ते तुम्ही दिले नसल्याने आवळेंनी त्यांच्या मतदारसंघात राहुल यांचे तिकट कापले, यात माझा दोष काय? आजपर्यंत सूडबुद्धीने राजकारण कधी केले नाही. येथून पुढे तुमच्या खांद्याला खांदा लावून कॉँग्रेस बळकटीचे काम करू, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष चेष्टा करीत
आवाडे-आवळे वाद केवळ जिल्हापुरता मर्यादित नव्हता. तो राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे प्रदेश कॉँग्रेस कमिटीत गेलो की ‘या आवाडे-आवळे’ अशी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण चेष्टा करीत असल्याचे आवळे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेत चूक झाली
जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत चूक झाल्याचे सांगत ‘राहुल (राहुल पी. पाटील) पुढील अडीच वर्षांसाठी कोणतीही चिठ्ठी येऊ दे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा कॉँग्रेस-राष्ट्रवादीचाच होईल,’ असे आवाडे यांनी सांगितले.
पक्षात घ्या; पण जरा पारखून
पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण संपर्कात आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी मिळून याबाबत निर्णय घेऊया, असे आवाडे यांनी सांगितले. यावर ‘साहेब, पक्षात घ्या; पण जरा पारखून. संधिसाधूपासून सावध रहा,’ असे विश्वास शिंदे (कणेरी) यांनी सांगितले.