महाडिक कुटुंबियांनी आता रूग्णालय उभारावे : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 03:44 PM2021-06-11T15:44:58+5:302021-06-11T15:57:17+5:30
chandrakant patil Kolhapur : येणाऱ्या प्रत्येक संकटावर, अडचणीवर मात करत करत कायम समाजाचा विचार करणाऱ्या महाडिक परिवाराने आता रूग्णालय उभारावे अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर : येणाऱ्या प्रत्येक संकटावर, अडचणीवर मात करत करत कायम समाजाचा विचार करणाऱ्या महाडिक परिवाराने आता रूग्णालय उभारावे अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने कोल्हापूर महापालिका, भाजप, ताराराणी आघाडीच्यावतीने हॉकी स्टेडियमजवळ उभारण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, समरजित घाटगे, महेश जाधव, स्वरूप महाडिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह भाजप, ताराराणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, धनंजय महाडिक यांनी एखाद्या खासगी रूग्णालयासारखे हे कोव्हिड केअर सेंटर उभारले आहे त्याबदद्ल मी त्यांचे अभिनंदन करतो. आरोग्याचे प्रश्न कायम राहणार आहेत. महाडिक यांच्याकडे मोठे मनुष्यबळ आहे. त्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांना पैशासाठी अडवलं जाणार नाही असं एखादे रूग्णालय उभारावे. त्यासाठी आवश्यक एजन्सी मी उपलब्ध करून देईन. दहा वर्षांनतर त्यांना पैसे परत करावे लागतील. पुण्यात ९०० बेडच्या रूग्णालयाचा असा प्रकल्प यशस्वी झाला आहे.
ताज मुल्लाणी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सुनील कदम, सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, अजित ठाणेकर, विजय पाटील, आशिष ढवळे, किरण नकाते, गणेश देसाई, अशोक देसाई, विजय जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.