महाडिकांनी पालकत्वाचा शब्द पाळला
By Admin | Published: July 19, 2016 12:33 AM2016-07-19T00:33:01+5:302016-07-19T00:53:45+5:30
निकिताच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा : नोकरी, लग्न, शिक्षणाचा खर्च उचलण्याची हमी
कोल्हापूर : येथील बोंद्रेनगर, धनगरवसाहतमधील पल्लवी बोडेकर या युवतीच्या आत्महत्येनंतर निराधार झालेली तिची बहीण निकिता हिच्या पालकत्वाच्या घेतलेल्या जबाबदारीचा शब्द माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पाळला. महाडिक यांनी सोमवारी निकिताच्या खर्चासाठी तिच्या नावे यूथ डेव्हलपमेंट बँकेत बचत खाते काढून त्यावर रोख ५० हजार रुपये जमा केले.
१९ जून रोजी बोंद्रेनगरातील धनगर वसाहत येथील पल्लवी बोडेकर या युवतीने आत्महत्या केली होती. त्यामुळे तिची बहीण निकिता ही निराधार झाली. माजी आमदार महाडिक यांनी तिच्या घरी भेट देऊन तिच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली. महिनाभर निकिताला मदत मिळाली नसल्याने ‘लोकमत’मध्ये निकिताच्या मदतीचे हात रितेच’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन महाडिक यांनी तातडीने सोमवारी तिला आर्थिक मदत केली.
सकाळी महाडिक यांनी निकिता बोडके हिला तिच्या नातेवाइकांसह गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात बोलावून घेऊन तिची विचारपूस केली. तिच्या सोबत तिचे चुलते आबाजी बोडेकर, विठ्ठल बोडेकर, कोयाप्पा बोडेकर, चुलतभाऊ राजू बोडेकर व मामा रामचंद्र शेळके, आदी नातेवाईक उपस्थित होते. तिच्या नावे यूथ बँकेच्या प्रधान कार्यालयात खाते उघडून तिच्या दैनंदिन गरजा व घरखर्चासाठी म्हणून खात्यावर रोख ५० हजार रुपये जमा केले. तिला
१८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तातडीने बँकेत नोकरीला घेण्याची तसेच यापुढील तिचा दैनंदिन खर्च आणि लग्नाच्या खर्चाची जबाबदारीही उचलली. सध्या निकिता १२ वीमध्ये शिक्षण घेत असल्याने तिच्या क्लासेसची फी भरण्याची जबाबदारीही उचलली. संगणक शिक्षण घेण्याचाही सल्ला देत पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी उचलली. यापुढे कोणतीही कमतरता भासल्यास थेट मला फोन करावा, अथवा त्या भागातील कार्यकर्ते विजयसिंह देसाई यांना अडचणी सांगाव्यात, असेही त्यांनी तिला सांगितले.
यावेळी विजयसिंह देसाई, बाजीराव किल्लेदार, नीलेश देसाई, बयाजी शेळके, तानाजी फाले, राजू आडुळकर, विकी जाधव, सोनबा फाले, विठ्ठल लांबोडे, रघू पाटील आणि बोंद्रनगर, धनगरवसाहत परिसरातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अन् निकिता गहिवरली
महाडिक यांनी निकिताच्या डोक्यावर हात ठेवून तिला मायेचा आधार दिला. त्यावेळी तिला गहिवरून आले. याप्रसंगी निकिताला आपले अश्रू लपविता आले नाहीत. महाडिक यांनी तिचे अश्रू पूसत ‘तू निराधार नाहीस, आम्ही सोबत आहोत, काळजी करू नकोस’, अशा शब्दांत तिला आधार दिला. त्यामुळे काही काळ वातावरण गंभीर बनले होते. महाडिक यांच्या या मदतीबद्दल निकिताच्या नातेवाइकांनी महाडिक यांचे आभार मानले.