महाडिक, महेश जाधव करणार भाजपचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:17 AM2021-01-01T04:17:47+5:302021-01-01T04:17:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला पक्षीय पातळीवर वेग आला असून भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत ताकदीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला पक्षीय पातळीवर वेग आला असून भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत ताकदीने उतरणार आहे. भाजपतर्फे ही निवडणूक माजी खासदार धनंजय महाडिक व देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली. या दोघांच्या नेतृत्वाखाली निवडणूक संचालन समिती येत्या दोन दिवसात जाहीर केली जाणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बुधवारी कोल्हापुरात होते. त्यांनी अजित ठाणेकर यांच्या कार्यपुस्तिकेच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना केल्या. मागची निवडणूक थोडक्यात हरलो असल्याने यावेळी अधिक दक्षतेने आणि मोठ्या ताकदीने निवडणूक लढवायची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाटील आता प्रदेशाध्यक्ष असल्याने, कोल्हापुरात ठाण मांडून त्यांना पूर्णवेळ या निवडणुकीत लक्ष देता येणार नाही. म्हणून त्यांनी या निवडणुकीचे नेतृत्व माजी खासदार धनंजय महाडिक व देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याकडे सोपविले आहे. तशा नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष पाटील व प्रदेश कार्यालयीन प्रमुख मुकुंद कुलकर्णी यांनी दिले आहे. येत्या दोन दिवसात त्यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक संचालन समितीने तयार करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. महाडिक-जाधव यांच्या नेतृत्वाखालील ही समिती उमेदवारी कोणाला द्यायची, कोणते प्रभाग वाटून घ्यायचे इथंपासून प्रचाराची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्यापर्यंतची सर्व धोरणे ठरविणार आहे.
सूचना - धनंजय महाडिक - महेश जाधव यांचे फोटो टाकावेत.