महाडिक, सतेज पाटील मुश्रीफांना भेटले

By admin | Published: December 4, 2015 12:16 AM2015-12-04T00:16:17+5:302015-12-04T00:23:28+5:30

विधान परिषदेची निवडणूक : प्रकाश आवाडेंचीही मुश्रीफांशी चर्चा; काँग्रेस नेत्यांचीही दिल्लीत चर्चा

Mahadik met Sathej Patil Ms. Sridhar | महाडिक, सतेज पाटील मुश्रीफांना भेटले

महाडिक, सतेज पाटील मुश्रीफांना भेटले

Next

कोल्हापूर/मुरगूड/कागल : महाराष्ट्रातील कोल्हापूरसह विधान परिषदेच्या आठ जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत गुरुवारी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात तासभर चर्चा झाली. या जागांवरील संभाव्य उमेदवार व दोन्ही काँग्रेसमधील जागावाटपाबाबत त्यामध्ये चर्चा झाल्याचे समजते.
पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी या शनिवारी रात्री उशिरा भारतात येणार आहेत; परंतु रविवारी दिल्ली एकदम शांत असते. सगळी कार्यालये बंद असतात; त्यामुळे उमेदवारांची घोषणाही सोमवारी (दि. ७) होण्याची शक्यता आहे. ज्यास उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यांना महाराष्ट्र प्रदेशकडून ए व बी फॉर्म त्याच दिवशी तातडीने उपलब्ध करून दिला जातो. ९ तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्याने पुरेसा अवधीही आहे. दरम्यान, आमदार महादेवराव महाडिक व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील या दोन्ही इच्छुक नेत्यांनी गुरुवारी सकाळी एक तासाच्या अंतराने राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची कागलमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व पाठिंबा देण्याची विनंती केली.
दरम्यान, सतेज पाटील यांनी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी भैया माने, शाहू आघाडीचे मनोहर पाटील, पक्षप्रतोद रमेश माळी, नगराध्यक्षा संगीता गाडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सत्ताधारी पक्षाचे सर्व नगरसेवक या बैठकीस उपस्थित होते. नंतर सतेज पाटील यांनी पंचायत समितीचे सभापती श्रीकांत ऊर्फ पिंटू लोहार, मंडलिक गटाचे नगरसेवक भैया इंगळे, संजय घाटगे गटाचे नगरसेवक संजय कदम यांचीही भेट घेतली.


राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मला उमेदवारी देईल, अशी अपेक्षा आहे. वेळ कमी असल्याने मी भेटीगाठी घेत आहे. मला या निवडणुकीत संधी द्या. विधान परिषदेचा आमदार कसा असावा, हे मी दाखवून देईन. माझ्या कामकाजाची पद्धत जाणून आहात.
- सतेज पाटील,

विधान परिषदेच्या निवडणुकीत आमची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मित्रपक्ष म्हणून आमचा पाठिंबा असेल. कोणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा विषय आहे. आमदार महाडिक, सतेज पाटील, प्रकाश आवाडे हे मला भेटले आहेत. ते सतत संपर्कात आहेत. मात्र, अंतिम टप्प्यात मला भेटत आहेत. कदाचित त्यांच्या बेरजा मागे-पुढे होत असाव्यात.
- हसन मुश्रीफ, आमदार

एकही अर्ज दाखल नाही : सतेज, जांभळेंसह चौघांनी सोळा अर्ज नेले
कोल्हापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
गुरुवारी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, प्रतिमा सतेज पाटील, माजी आमदार अशोकराव जांभळे, एस. आर. पाटील यांनी सोळा अर्ज नेले. आतापर्यंत या अर्जांची संख्या २९ झाली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी २७ डिसेंबरला मतदान, तर ३० डिसेंबरला मतमोजणी होत आहे. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या ठिकाणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज विक्री व अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया होत आहे.
गुरुवारी दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वतीने चार अर्ज, प्रतिमा सतेज पाटील यांच्या वतीने चार अर्ज, माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी स्वत: चार अर्ज व एस. आर. पाटील यांनीही चार अर्ज नेले.

दादा, यावेळी मदत केलीच पाहिजे
मुरगूड (ता. कागल) येथे प्रवीणसिंह पाटील यांच्या निवासस्थानी सतेज पाटील यांनी सर्व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘दादा, यावेळी मदत केलीच पाहिजे’, अशी गळ घातली.
काँग्रेस पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीतील विजयासाठी मुरगूडकरांची नितांत गरज आहे. या निवडणुकीत प्रवीणदादा आपण मला मदत केलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे इच्छुक उमेदवार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केली.
जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या प्रवीणसिंह पाटील यांनी कागल तालुक्यामध्ये हसन मुश्रीफ यांचे नेतृत्व मान्य केले आहे; पण पाटील गटाच्या नगरसेवकांची सतेज यांनी भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या; पण प्रवीणसिंह यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. 3

माझा ‘नेता’ आला...
महाडिक भेटून गेल्यानंतर सतेज पाटील तिथे गेले. त्यांना पाहून मुश्रीफ यांनी हसत-हसत ‘माझा नेता आला...’ असे म्हणत स्वागत केले. या वक्तव्याची चर्चा झाली.
आमदार महाडिक हे गुरुवारी दिवसभर गाठीभेटींत व्यस्त राहिले. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्ष काय निर्णय घेतो, त्यावर पुढील भूमिका निश्चित करू, असे स्पष्ट केले.

Web Title: Mahadik met Sathej Patil Ms. Sridhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.