महाडिक-सतेज संघर्षात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त!-- चंद्रकांतदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:28 AM2017-10-26T01:28:52+5:302017-10-26T01:32:54+5:30
सरवडे : राजकारणामुळे समाजात तेढ, तर घराघरांत वैमनस्य निर्माण होत आहे. लोकशाही प्रक्रियेत निवडणुका अपरिहार्य आहेत. निवडणुकीपुरते राजकारण करीत निकालानंतर सर्व हेवेदावे विसरून प्रेम आणि दोस्ती यातून विधायक समाजनिर्मिती ,विकासाचे प्रश्न यापुढे हातात-हात घालून सोडविले पाहिजेत, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. महाडिक - सतेज पाटील राजकीय संघर्षात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. बदलत्या राजकारणात हे सर्व विसरून तरुणांची शक्ती विधायक कार्यात वापरूया पिढ्यान्पिढ्या वैरत्व नको, असा सल्लाही त्यांनी दिला.
बिद्री (ता. कागल) येथील दूधसाखर महाविद्यालयाच्या प्रागंणात बिद्री साखर कारखाना निवडणुकीत महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विजयोत्सव मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जलसंपदा मंत्री आमदार हसन मुश्रीफ होते.
चंद्रकांतदादा पुढे म्हणाले, देशात दरडोई उत्पन्नात कोल्हापूर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र, उत्पन्नाचा बहुतांशी हिस्सा हा छोट्या सोसायटीपासून ते ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आडवा-आडवीत, जिरवा-जिरवीत अनाठायी खर्च होतो. मात्र, संघर्ष, कटूता टाळत ही ताकद विधायक कार्यासाठी खर्च करूया आणि जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावूया, असेही ते म्हणाले.
मुश्रीफम्हणाले, ‘बिद्री’च्या निवडणुकीत शेतकरी सभासदांना ऊस दर, गाळप क्षमता वाढविणे याबरोबरच तोडणी कार्यक्रमात सुसूत्रता आणण्याचा दिलेला शब्द नवनिर्वाचित संचालकांनी पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहावे. त्याच बरोबर पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
आमदार हाळवणकर म्हणाले, ‘बिद्री’त सक्षम नेतृत्व देत चांगल्या कारभाराला पाठबळ देण्यासाठी भाजपने राष्टÑवादीला साथ दिली; मात्र हा पैरा फेडणार असल्याचे ते म्हणतात. कारखाना हा राजकारण म्हणून न पाहता शेतकºयांच्या आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून पाहिले. निकोप स्पर्धा करून शेतकºयांचे जीवनमान उंचाविण्यासाठी संचालक मंडळाने कार्यरत राहावे .
प्रास्ताविकात नूतन अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, या विजयाचे श्रेय व्यासपीठावरील नेतेमंडळींचे असून, सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी ११ महिन्यांत कारखान्याचा विस्तार करीत सध्या गाळप क्षमता ७५०० हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवू आणि ३१ मार्चपर्यंत कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळपाचे नियोजन करू तसेच इथेनॉल प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कायद्याच्या चौकटीत बसवून अपात्र सभासदांना पात्र करून साखर देण्याचा प्रयत्न येत्या काही महिन्यांत केला जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी माजी आमदार नामदेवराव भोईटे, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, विलास कांबळे, राहुल देसाई, धैर्यशील पाटील, नाथाजी पाटील, युवराज पाटील, मनोज फराकटे, भूषण पाटील, पंडितराव केणे, विवेक गवळी संचालक, पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी स्वागत केले. विठ्ठलराव खोराटे यांनी आभार मानले.
अन् ‘दादा’ भडकले...
बिद्री साखर कारखान्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर विजयी मेळाव्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आगमन झाले आणि ते थेट कार्यक्रमस्थळी गेले. मात्र, तेथे कोणीच नव्हते. त्यानंतर तेथून त्यांना कारखाना गेस्ट हाऊसमध्ये आणण्यात आले. तेथेही कोणीच नसल्याने ते जाम भडकले. त्यातच नूतन उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे तेथे आले. त्यांना पाहताच त्यांचा पारा चढला आणि ते म्हणाले, खोराटे तुम्ही आम्हाला वाट पाहायला लावता. तुम्ही आम्हाला वाट पाहायला लावणार असाल तर जनतेचे काय कल्याण करणार! असे म्हणताच सर्वांची भंबेरी उडाली.