महाडिकांची भिस्त ‘गोकुळ’च्या १७ संचालकांवर-: सतेज पाटील, युतीला तोंड देण्यासाठी फौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:17 AM2019-03-15T01:17:06+5:302019-03-15T01:29:26+5:30
‘गोकुळ’ दूध संघाचे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच ‘गोकुळ’वरची आपली सत्ता अबाधित राहावी यासाठी सत्ताधारी आणि ती खेचून आपल्याकडे घेण्यासाठी
समीर देशपांडे ।
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच ‘गोकुळ’वरची आपली सत्ता अबाधित राहावी यासाठी सत्ताधारी आणि ती खेचून आपल्याकडे घेण्यासाठी विरोधकांनी का कंबर कसली आहे याचे उत्तरच ‘गोकुळ’चे राजकीय महत्त्व स्पष्ट करणारे आहे. कारण ‘गोकुळ’च्या एकूण २१ संचालकांपैकी तब्बल १७ संचालक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादी धनंजय महाडिक यांच्यासाठी किमान एकत्र आल्याचे चित्र दिसत असताना आमदार सतेज पाटील यांच्यासह युतीला तोंड देण्यासाठी महाडिक यांची भिस्त ‘गोकुळ’च्या संचालकांवर राहणार आहे.
जिल्ह्यातील तीन लाख दूध उत्पादकांशी चार हजार दूध संस्थांच्या माध्यमातून एक नाते निर्माण केलेल्या ‘गोकुळ’च्या माध्यमातून जिल्ह्यातील उत्पादकांना महिन्याला १३५ कोटी रुपयांचे वितरण करण्यात येते. यातील अनेक ज्येष्ठ संचालक सहा-सहा वेळा ‘गोकुळ’वर निवडून आलेले आहेत.महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या या संघाची रचनाच ‘सर्वपक्षीय’ आहे. त्यामुळेच कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना असे संचालक येथे कार्यरत आहेत.
पी. एन. पाटील हे जरी कॉँग्रेसनिष्ठ असले तरी महाडिक यांनी हा बलाढ्य संघ चालविताना सत्तेवर येणाऱ्यांशी जमवून घेण्याचे धोरण ठेवले आहे. संघ हातात राहिला तर आपल्याला जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता येते, हे दोघेही जाणून आहेत. पी. एन. पाटील हे अन्य तालुक्यांत फारसा हस्तक्षेप करीत नसले तरी महाडिक यांनी संघाच्या बळावर बाराही तालुक्यांमध्ये स्वत:ला मानणारे गट तयार केले आहेत. संचालक या गटाचेच तालुक्यात काम करतात. आतापर्यंतच्या अनेक लोकसभा, विधानसभा आणि साखर कारखाने, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्येच कोणत्याही पक्षांपेक्षा ‘महाडिक फॅक्टर’ महत्त्वाचा का ठरतो, याचे कारण ‘गोकुळ’च्या सत्तेत आहे.
महाडिक यांचे हेच बलस्थान ओळखून त्यावर घाव घालण्यासाठी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी जो लढा उभारला आहे, त्याचे कारणच हे आहे. महाडिक, पी. एन. यांच्या ताब्यातून संघ काढून घेतला की त्यांच्या राजकारणाला मर्यादा येतील, हेच यामागचे राजकारण आहे. गतवर्षी ‘मल्टिस्टेट’वरून जो संघर्ष उभा राहिला यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी उघडपणे उडी घेण्याचे कारणही हेच आहे.
‘गोकुळ’च्या एकूण २१ संचालकांपैकी चंद्रकांत बोंद्रे यांचे निधन झाल्याने ती जागा भरलेली नाही. उर्वरित २० पैकी विश्वास जाधव (पन्हाळा), अनुराधा पाटील (शाहूवाडी) आणि अनिल यादव (शिरोळ) हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये येत नाहीत. अरुण नरके हे जरी पन्हाळा तालुक्याचे प्रतिनिधी असले तरी त्यांचे प्रभावक्षेत्र अन्य तालुक्यांमध्येही आहे.त्यामुळे उर्वरित संचालकांपैकी चंदगडचे राजेश नरसिंगराव पाटील हे उघडपणे प्रा. संजय मंडलिक यांचा प्रचार करणार हे निश्चित आहे. मंडलिक यांच्या भगिनी राजेश पाटील यांच्या पत्नी आहेत. दुसरे संचालक कागलचे अंबरीश घाटगे हे शिवसेनेचे असल्याने त्यांना धनुष्यबाणाचा प्रचार करावा लागेल. तज्ज्ञ संचालक बाबा देसाई हे भाजपचे नेते असल्याने त्यांना ‘युतीधर्माची शिस्त’ पाळावी लागेल.
उर्वरित ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे (आजरा), अरुण नरके (पन्हाळा), विश्वास पाटील (करवीर), रणजितसिंह पाटील (कागल), अरुण डोंगळे (राधानगरी), धैर्यशील बजरंग देसाई (भुदरगड), दीपक भरमू पाटील (चंदगड), पांडुरंग धुंदरे (राधानगरी), उदय निवासराव पाटील (करवीर), बाळासाहेब खाडे (करवीर), सत्यजित सुरेश पाटील (करवीर), विलास कांबळे (भुदरगड), जयश्री आनंदराव पाटील-चुयेकर (करवीर), रामराजे कुपेकर (तज्ज्ञ संचालक, गडहिंग्लज) या सर्व १७ संचालकांना महाडिक यांच्या प्रचारासाठी रात्रीचा दिवस करावा लागणार आहे हे निश्चित.
संचालकांचा संस्थांशी घनिष्ठ संबंध
दूध संस्थांच्या ठरावावर हे संचालक म्हणून निवडून येत असल्याने या संस्थांच्या अडीअडचणींची तातडीने ते दखल घेतात. फोनवरून जरी माहिती दिली तरी पर्यवेक्षकांची यंत्रणा लावून ती कामे केली जातात. सुरुवातीला दूध उपलब्ध करून देण्यापर्यंत प्रयत्न केले जातात. त्यामुळे दूध संस्थांचे संचालक हे या दूध संघांच्या संचालकांच्या सातत्याने संपर्कात असतात.
कर्मचारी, वाहतूक ठेकेदारांची संख्या मोठी
‘गोकुळ’चे एकूण दोन हजार कर्मचारी आहेत. याशिवाय गेली अनेक वर्षे टॅँकर, टेम्पो आणि संघाला लागणाºया अन्य गाड्यांचे ठेकेदार, संघाला अनेक वर्षे साहित्य पुरवठा करणारे ठेकेदार ही संख्या मोठी आहे. सर्व तालुक्यांमधील कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक अशा उपक्रमांना सातत्याने मदतीचा ‘हात’ देण्याची ‘गोकुळ’ची परंपरा आहे. या भांडवलावर या संचालकांनी आपापल्या तालुक्यांमध्ये आपले एक ‘स्थान’ निर्माण केले आहे. या जोरावरच आता महादेवराव महाडिक यांनी ही फौज रणांगणात उतरविली आहे.
‘गोकुळ’वर जाऊ इच्छिणारे मंडलिकांसोबत
सतेज पाटील यांनी गेल्या तीन-चार वर्षांत ‘गोकुळ’विरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्या पॅनेलमधून ज्यांना उमेदवारी पाहिजे आहे, असे अनेकजण संजय मंडलिक यांच्या प्रचारात दिसणार आहेत.
भाजपचे रणजित पाटील महाडिकांच्या प्रचारात
मुरगूडचे ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील हे भाजपमध्ये आहेत. मात्र त्यांनी याआधीच मेळाव्यात ‘आम्हाला धनंजय महाडिक यांना मदत करावी लागेल,’ असे जाहीर केले आहे.