लोकसभेची लढाई कोल्हापूर विरूद्ध महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:27 AM2019-04-03T11:27:01+5:302019-04-03T11:29:08+5:30
लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील निवडणूक एकतर्फी होण्याच्या दिशेने वाटचाल सुरूआहे. ही लढाई महाडिक विरुद्ध कोल्हापूर अशी झाली आहे. जनता पेटून उठली, की कशी घरात बसवते हे लवकरच कळेल. ‘संसदरत्न’ म्हणून मिरविण्यापेक्षा लोकांच्या मनातील
कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील निवडणूक एकतर्फी होण्याच्या दिशेने वाटचाल सुरूआहे. ही लढाई महाडिक विरुद्ध कोल्हापूर अशी झाली आहे. जनता पेटून उठली, की कशी घरात बसवते हे लवकरच कळेल. ‘संसदरत्न’ म्हणून मिरविण्यापेक्षा लोकांच्या मनातील रत्न झाला असता, तर ही वेळ आली नसती. आता कुठलीही लाट आली तरी तुमचे काही भले होणार नाही. अशी टीका आमदार प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी केली.
तुरंबे (ता. राधानगरी) येथे सेना भाजपचे लोकसभेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा जल्लोषात प्रारंभ झाला. यावेळी आबिटकर बोलत होते. ते म्हणाले, मागील निवडणुकीत मंडलिकांचा संपर्क कमी होता, लोकांमध्ये विश्वासही नव्हता; पण आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या वेळी मोदींच्या लाटेतही लोकांनी महाडिकांना निवडून दिले; पण त्याची जाण त्यांनी ठेवली नाही. आता कुठलीही लाट तुम्हाला वाचवू शकणार नाही, तुम्ही सुगीचे खासदार झाला आहात, आता उगवला आहात. जनतेत मिसळलाच नाही मग तुम्हाला कशा व्यथा कळणार. गावागावांत नुसतीच विकासकामांची उद्घाटने करून ठेवली, प्रत्यक्षात कामे झालीच नाही, असे सांगून आता जनतेनेच घरी बसविण्याचा विडा उचलला आहे.
स्वागत गोकुळचे संचालक बाबा देसाई यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उमेदवार प्रा. संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, पुणे-म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, माजी आमदार संजय घाटगे, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिव चरापले, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, अशोक देसाई, जि. प. सदस्य वंदना जाधव, शिवानी भोसले, जिल्हाप्रमुख विजय देवणे, के. जी. नांदेकर, नाथा पाटील, प्रवीणसिंह सावंत, वीरेंद्र मंडलिक, सुरेश साळोखे, मारुतराव जाधव, बाजीराव पाटील, बाबा नांदेकर, नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्यासह सेना- भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
कितीवेळा पॅचवर्क करणार
काँग्रेस-राष्ट्रवादीतील पॅचवर्कसाठी शरद पवार कोल्हापुरात आल्याचा दाखला देत संजय पवार यांनी कितीवेळा कोल्हापुरात येताय. पॅचवर्क खड्डे पडले तर करतात. येथे तर पूर्ण रस्ताच उखडलाय. कितीवेळा पॅचवर्क करणार, असा सवाल करत या रस्त्यावरूनच मंडलिक खासदार म्हणून दिल्लीत जाणार आहेत, हे लक्षात ठेवा, असे सांगितले.
महाडिक शोधून मारतील
प्रचारप्रारंभाच्या या सभेच्या सुरुवातीसच एका कार्यकर्त्याने कविता ऐकवली. यात महाडिक निवडून येणार नाही पुन्हा असे भाष्य कवितेच्या माध्यमातून करत महाडिक परिवाराच्या राजकीय भूमिकांवर बोट ठेवले. याला उपस्थितांनीही टाळ्या शिट्ट्यांनी जोरदार दाद दिली. नाव विचारल्यावर आपले नाव तेवढे छापू नका, मी जरा गावापासून लांब पल्ल्यावर राहतो. नाहीतर महाडिक मला रात्रीचे उचलून नेतील, असे सांगून भीती व्यक्त केली.
कोण काय म्हणाले,
समरजितसिंह घाटगे : विकासाचे मुद्दे बोलून मते पडत नाहीत, मंडलिक नावाचे मार्केटिंग करा. कागलमध्ये मताधिक्यासाठी कटिबद्ध
संजयबाबा घाटगे : प्रा. मंडलिकांना कागलमध्ये आजवर मिळाले नाही इतके उच्चांकी मताधिक्य देऊ.
संजय पवार : महाडिक प्रवृत्ती संपविण्यासाठी सतर्क राहून ताकदीने प्रचारात उतरा. आमच्याकडे जिल्ह्यातील ६0 टक्के नेते आहेत.
नाथा पाटील : दुटप्पी भूमिका घेणाऱ्या महाडिक कुटुंबावर किती विश्वास ठेवायचे पवारांनीही ठरवावे.
वीरेंद्र मंडलिक : मंडलिकांची सर्वसामान्य जनतेशी कायमच नाळ जुळली आहे, तर महाडिकांनी ग्रामीण भागाला वाळीत टाकले.
मारुतराव जाधव : मंडलिकांवर जास्त बोलू नका, आहे ती मते पण पडणार नाहीत.