Mahadevrao Mahadik: देव संकटात आणेल त्यावेळी महाडिक संकटात येईल - महादेवराव महाडिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 01:30 PM2022-06-11T13:30:17+5:302022-06-11T13:32:05+5:30
कोणी मला काही म्हणो मी त्याचा विचार करत नाही, चांगल्या भावनेने मी राजकारण करत असतो, स्वार्थ ठेवून केलेले राजकारण टिकत नाही
कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीतील राजकीय नाट्य घडामोडीनंतर भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. याविजयानंतर कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या विजयामुळे महाडिक गटाला पुन्हा बळ मिळाले आहे. यासर्व घडामोडीतच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली.
ही लोकसभेची रंगीत तालीम आहे असे समजून या निवडणुकीत आम्ही उतरलो, महाडिकांना लढायची सवय आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, अशा शब्दात महादेवराव महाडिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. इतकच नाही तर, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा असे सांगत पुढील राजकारणाचे संकेतच दिले.
महाडिक म्हणाले, जिंकणं आणि हरणं यावर महाडिक कुटुंबाचं संकट नाही. ज्यावेळी तो (देव) संकट आणेल त्यावेळी महाडिक संकटात येईल, अन्यथा महाडिकांना कोणी संकटात आणू शकणार नाही. माझं नाव महादेव, नावच परमेश्वराचं आहे, त्याला कोणी धक्का पोहोचवू शकत नाही असे ते म्हणाले.
राजकारणात वजाबाकी होत असते, पण त्याचे राजकारण केलं नाही
कोल्हापूर जिल्ह्यानं भरभरुन दिलं आहे, जनतेनं खूप प्रेम दिलं आहे. राजकारणात वजाबाकी होत असते, पण त्याचे राजकारण केलं नाही. स्वतःचे धंदे सांभाळून मी राजकारण केलं. मी जे पेरले ते उगवून येत आहे. जनतेनं मला दीर्घायुष्य दिलं आहे, जनतेने मला दिले, मी जनतेला देत राहीन असेही ते म्हणाले.
पालकमंत्री सतेज पाटीलांना टोला
महादेवराव महाडिक यांनी लक्ष्मण रेषा मारायला हवी असे म्हणत पालकमंत्री सतेज पाटील यांना टोला लगावला. जर लक्ष्मण रेषा ओलांडली आणि सीतामाई गेली तसे राजकारणात होते, माणसाने राजकारण लक्ष्मण रेषा मारली पाहिजे असे महाडिक म्हणाले. जिल्ह्याच्या रणामध्ये महाडिक कायम असणार आहे. कोणी मला काही म्हणो मी त्याचा विचार करत नाही, चांगल्या भावनेने मी राजकारण करत असतो, स्वार्थ ठेवून केलेले राजकारण टिकत नाही, असेही ते म्हणाले.