शेतकऱ्यांना लुटलेल्या पैशाची महाडिकांना मस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:23 AM2021-04-24T04:23:23+5:302021-04-24T04:23:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘आपण सगळ्यांचा बाप आहे’, अशी वल्गना करणाऱ्या महादेवराव महाडीक यांना एवढी मस्ती, धाडस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘आपण सगळ्यांचा बाप आहे’, अशी वल्गना करणाऱ्या महादेवराव महाडीक यांना एवढी मस्ती, धाडस आले कोठून? गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लिटरमागे लुटलेल्या पैशातून ही मस्ती आली असून, स्वाभिमानी उत्पादक ती मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
‘गोकुळ’ निवडणूक प्रचारार्थ शुकवारी करवीर तालुक्यातील ठरावधारकांच्या बैठकीत ते बाेलत होते. मंत्री पाटील म्हणाले की, गेल्या २५ वर्षात टँकरच्या माध्यमातून ‘गोकुळ’ला लुटण्याचे काम महाडीक यांनी केले असून, साेशल मीडियाच्या माध्यमातून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्यांचा ‘गोपाळ’ संघ का बंद पडला, महाडिकांचा कोल्हापूरशी संबंध काय? त्यांनी जिल्ह्यातील एकाही संस्थेचे संस्थापक नाहीत, आले तिथे घुसले. लोक आपल्या मागून फरफटत येतात, हुकूम केला की हजारो ठराव गोळा होतात, या मगरुरीमध्ये ते आहेत. करवीरमधील ठरावधारक स्वाभिमानी आहे, स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रेदादा व आनंदराव पाटील-चुयेकर यांनी स्वत:ची अस्मिता निर्माण केली. सत्ताधाऱ्यांना २५ वर्षे दिली, आम्हाला पाच वर्षे द्या, वचननामा पूर्ण केला नाहीतर पुन्हा निवडणूक लढणार नाही, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
खासदार संजय मंडलिक म्हणाले की, करवीरची भूमिका महत्त्वाची राहणार असून, सत्ता आल्यानंतर विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांच्या नेतृत्वाखालीच कारभार चालेल. करवीरकरांनी रोपटे मोठे केले; मात्र वाहतूक ठेकेदाराचा ‘गोकुळ’ घशात घालण्याचा प्रयत्न आहे.
माजी आमदार चंद्रदीप नरके, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
मधुकर जांभळे यांनी स्वागत केले. आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, करवीरच्या सभापती मीनाक्षी पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने आदी उपस्थित होते. प्राचार्य महादेव नरके यांनी उमेदवारांची ओळख करून दिली.
मग दहा रुपये तुम्ही का जादा दिले नाहीत
आम्ही सुरुवातीपासून उत्पादकाला दोन रुपये जादा दर देऊ, असेच म्हणत आलो; मात्र परवा दहा रुपये देणारे दोन रुपयांवर कसे आले? असे वक्तव्य वाचनात आले, भले आम्ही दहा रुपये म्हटलेही असेल, मग २५ वर्षे सत्ता तुमच्या ताब्यात असताना का दिला नाही. असा सवाल मंत्री पाटील यांनी पी. एन. पाटील यांना केला.
महाडिकांनी आमदारकी व्यवसायासाठी भोगली
महादेवराव महाडिक हे १८ वर्षे आमदार होते. त्यांनी एखाद्याला हृदय शास्त्रक्रिया किंवा इतर आजारासाठी पत्र दिलंय का? त्यांनी आमदारकी आपल्या व्यवसायासाठी भोगली आहे, अशी टीका मंत्री पाटील यांनी केली.
महाडिक ‘चंद्र, सूर्य’ही देतील
आता महादेवराव महाडिक यांचे फोन येतील, त्यांच्या बोलण्यात मोठी आश्वासने असतात. कदाचित, मतदान करा, तुम्हाला ‘चंद्र,सूर्य’ही देतो म्हणतील. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
सत्ताधाऱ्यांना मतदान म्हणजे आई, बायकोशी प्रतारणा
मल्टीस्टेटचा डाव हाणून पाडला म्हणूनच तुम्हाला आता मताचा अधिकार मिळाला, तरीही तुम्ही सत्ताधाऱ्यांना मतदान केले तर ते तुमची बायको व आईशी प्रतारणा होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
मल्टीस्टेटविरोधी भूमिकेची नरकेंना झळ
मल्टीस्टेटच्या लढ्यात चंद्रदीप नरके अग्रभागी होते. खुपीरे येथील बैठकीत एका नेत्याने विधानसभेला नाचवू, असा इशारा दिला होता. नरके यांना खूप त्रास झाला, त्यांनी खूप सोसल्याचे खासदार संजय मंडलीक यांनी सांगितले.
बारा वाजता उठणारे पाहिजे
काही मंडळी दुपारी बारा वाजले की जगाला आग लागली तरी उठणार नाहीत. अशी माणसं की रात्री बारा वाजले तरी सामान्य माणसाच्या हाकेला उठणारे सतेज पाटील, विश्वास पाटील, चंद्रदीप नरके तुम्हाला पाहिजेत, हे ठरवा असे मंत्री पाटील यांनी सांगितले.