शेतकऱ्यांना लुटलेल्या पैशाची महाडिकांना मस्ती : सतेज पाटील यांची घणाघाती टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 07:30 PM2021-04-23T19:30:02+5:302021-04-23T19:39:57+5:30
GokulMilk Election Kolhapur : आपण सगळ्यांचा बाप आहे, अशी वल्गना करणाऱ्या महादेवराव महाडीक यांना एवढी मस्ती, धाडस आले कोठून? गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लिटरमागे लुटलेल्या पैशातून ही मस्ती आली असून, स्वाभिमानी उत्पादक ती मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
कोल्हापूर : आपण सगळ्यांचा बाप आहे, अशी वल्गना करणाऱ्या महादेवराव महाडीक यांना एवढी मस्ती, धाडस आले कोठून? गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लिटरमागे लुटलेल्या पैशातून ही मस्ती आली असून, स्वाभिमानी उत्पादक ती मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
गोकुळ निवडणूक प्रचारार्थ शुकवारी करवीर तालुक्यातील ठरावधारकांच्या बैठकीत ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले की, गेल्या २५ वर्षात टँकरच्या माध्यमातून गोकुळला लुटण्याचे काम महाडीक यांनी केले असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्यांचा गोपाळ संघ का बंद पडला, महाडिकांचा कोल्हापूरशी संबंध काय? त्यांनी जिल्ह्यातील एकाही संस्थेचे संस्थापक नाहीत, आले तिथे घुसले. लोक आपल्या मागून फरफटत येतात, हुकूम केला की हजारो ठराव गोळा होतात, या मगरुरीमध्ये ते आहेत. करवीरमधील ठरावधारक स्वाभिमानी आहे, स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रेदादा व आनंदराव पाटील-चुयेकर यांनी स्वत:ची अस्मिता निर्माण केली. सत्ताधाऱ्यांना २५ वर्षे दिली, आम्हाला पाच वर्षे द्या, वचननामा पूर्ण केला नाहीतर पुन्हा निवडणूक लढणार नाही, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मधुकर जांभळे यांनी स्वागत केले. आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, करवीरच्या सभापती मीनाक्षी पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने आदी उपस्थित होते. प्राचार्य महादेव नरके यांनी उमेदवारांची ओळख करून दिली.