महाडिकांची भिस्त भरमूअण्णांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:20 AM2019-04-08T00:20:42+5:302019-04-08T00:20:47+5:30
नंदकुमार ढेरे । लोकमत न्यूज नेटवर्क चंदगड : पक्षीय राजकारणापेक्षा गटाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या चंदगड तालुक्यात २००९ व २०१४ ...
नंदकुमार ढेरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदगड : पक्षीय राजकारणापेक्षा गटाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या चंदगड तालुक्यात २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा मागोवा घेतल्यास दोन्ही निवडणुकीत मंडलिक बाप-लेकांना तालुक्यातील मतदारांनी आघाडी दिली आहे. तर ही आघाडी मोडून काढण्यासाठी खासदार धनंजय महाडीक यांची खरी भिस्त आहे ती माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांच्यावरच.
तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारण चालते हे सर्वश्रुत आहे. तालुक्यात प्रा. मंडलिक यांनी प्रचाराचा सपाटा लागला आहे. तर महाडीक यांच्यासाठी भरमूअण्णा व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. मात्र विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाल्याने कुणाला पाठिंबा द्यायचा या संभ्रमावस्थेत कार्यकर्ते आहेत.
तालुक्यात काँगे्रस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा या पक्षांचा मताचा गठ्ठा कायम आहे. भरमूअण्णा व तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील हे काँगे्रसमध्ये कार्यरत आहेत. माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी काँगे्रस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून राजेश पाटील यांना ‘गोकुळ’मध्ये संचालकपद दिले आहे. मात्र, शिवसेनेचे उमेदवार मंडलिक हे राजेश यांचे मेव्हुणे असल्याने त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हास्तरावर गढूळ झालेल्या राजकीय परिस्थितीची लागण चंदगड तालुक्यातही झाली आहे. भरमूअण्णा यांनी खासदार महाडीक यांचा प्रचार सुरू केला असून ते तालुका पिंजून काढत आहेत. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ते महाडीकांसाठी जीवाचे रान करतील पण याचे फळ त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळणार का ? हे येणारा काळच ठरविणार आहे.
महादेवराव महाणिक व आमदार सतेज पाटील यांनाही मानणारे कार्यकर्ते तालुक्यात आहेत. महाडिक यांनी महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेतल्या आहेत. सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांना संपर्कात ठेवण्यासाठी यंत्रणा राबविली आहे.
तालुक्यात मंडलिक यांच्या प्रचारार्थ गोपाळराव पाटील, नामदेव पाटील, प्रभाकर खांडेकर, संग्राम कुपेकर, सुनिल शिंत्रे, शांता जाधव, श्वेता नाईक तर महाडीक यांच्यासाठी सभापती बबन देसाई, उपसभापती विठाबाई मुरकुटे, दीपक पाटील, ज्योती पाटील, सचिन बल्लाळ, शांताराम पाटील, भैरू खांडेकर, दयानंद काणेकर, अरूण पिळणकर, बाबूराव हळदणकर, अजित व्हन्याळकर, मायाप्पा पाटील ही मंडळी उतरली आहेत. मात्र, तालुक्यात राष्ट्रवादीला युवा कार्यकर्त्यांची कमतरता जाणवत आहे. स्वाभिमानीचे कार्यकर्ते प्रचारात दिसत नाहीत.
जि. प. सदस्यांच्या भूमिकेकडे लक्ष
महादेवराव यांच्यामुळे ‘गोकुळ’चे संचालकपद मिळालेले राजेश पाटील हे शिवसेनेचे मंडलिक यांचे मेहुणे असल्याने ते मेहुण्यांना मदत करणार की महाडिक यांचा प्रचार करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. जि.प. सदस्य अरूण सुतार हे राजेश पाटील यांचे समर्थक असल्याने त्यांचीही भूमिका पाटील यांच्या भूमिकेवरच अवलंबून आहे. जि.प.सदस्य कल्लाप्पा भोगण व विद्या पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मात्र, सत्ता स्थापनेत विकास निधी व अन्य कारणासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांच्याकडून निधीही मिळविला आहे. त्यामुळे भोगण व पाटील पक्षादेश मानणार की पाटील यांच्या शब्दाला जागणार याबाबत संदिग्धता आहे.