‘टॉप थ्री’ खासदारांच्या यादीत महाडिक
By admin | Published: May 1, 2016 12:49 AM2016-05-01T00:49:33+5:302016-05-01T00:49:33+5:30
पी.आर.एस. संस्थेचा अहवाल : दिल्लीच्या वर्तुळात उमटविला ठसा; तिसऱ्या स्थानावरचा बहुमान
कोल्हापूर : खासदार पदाची धुरा हाती घेतल्यानंतर धनंजय महाडिक यांनी धडाकेबाज कार्यशैलीची आणि कर्तृत्वाची झलक दाखवली आहे. कोल्हापूर शहर, जिल्हा ते राज्य पातळीवरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने संसदेत मांडत खासदार महाडिक यांनी दिल्लीच्या वर्तुळात स्वत:चा ठसा उमटवला आहे.
देशातील सर्व खासदार आणि आमदारांच्या कार्याचे मूल्यमापन करणाऱ्या पी.आर.एस. इंडिया या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार खासदार महाडिक हे ‘टॉप थ्री’मध्ये पोहोचले आहेत. कोल्हापूरला अशा पद्धतीचा बहुमान प्रथमच लाभला.
धनंजय महाडिक यांनी खासदार पदाची शपथ घेतल्यानंतर विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूरच्या स्थानिक प्रश्नांबरोबर इतर अनेक प्रश्न संसदेत मांडून त्यांनी कोल्हापूरचा आवाज बुलंद केला.
कोल्हापूरच्या स्थानिक प्रश्नांपासून ते राज्य-राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न अभ्यासपूर्ण रीतीने मांडून महाडिक यांनी संसदेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. देशभरातील शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी महाडिक यांनी संसदेत आवाज उठविला.
पंचगंगा नदी प्रदूषण, रेल्वेच्या प्रलंबित समस्या, कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडणे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील रस्ते उभारणी, महामार्गावरील समस्या, शैक्षणिक अभ्यासक्रमात वाहतुकीची शिस्त, महिलांचे आरोग्य, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित करून ते प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावाही केला. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल विविध संस्थांनी घेतली आहे.
पी.आर.एस. लेजिस्लेटिव्ह रिसर्च संस्था खासदार आणि सर्व राज्यातील आमदारांच्या कार्याचे मूल्यमापन करते. या संस्थेला सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च संस्थेचे सहकार्य असते. पी.आर.एस.ने सर्व खासदारांच्या कामकाजाचा लेखाजोखा घेतला. त्यात संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक तिसऱ्या स्थानावर आहेत.
पावणेदोन वर्षांत मांडले तब्बल ४९५ प्रश्न
४खासदार महाडिक यांनी गेल्या पावणेदोन वर्षांत संसदेत ४९५ प्रश्न मांडले आहेत. त्यापैकी बहुतेक सर्वच प्रश्नांची दखल केंद्र शासनाने घेतली असून, अनेक मुद्द्यांवर कार्यवाही सुरू आहे. विशेष म्हणजे, धनंजय महाडिक हे लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून गेले आहेत. संसदेतील कसलाही अनुभव नसताना महाडिक यांनी दोन वर्षांतील कामांमुळे देशातील ‘टॉप थ्री’च्या खासदारांच्या यादीत स्थान मिळविले.
४टॉप थ्री खासदारांमध्ये प्रथम क्रमांकावर सुप्रिया सुळे, द्वितीय क्रमांकावर शिवाजीराव आढळराव-पाटील आणि तिसऱ्या स्थानावर धनंजय महाडिकांचे नाव आहे.