बावडेकरांचा ‘विश्वास’ मिळविण्यासाठी महाडिकांचे पॅचवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:55 AM2018-09-15T00:55:43+5:302018-09-15T00:56:01+5:30

माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी थेट आपले विरोधक असलेल्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या घरी जाऊन राजकारणातील गुगलीच टाकली आहे.

Mahadik's patchwork to get 'trust' of Bavdekar | बावडेकरांचा ‘विश्वास’ मिळविण्यासाठी महाडिकांचे पॅचवर्क

बावडेकरांचा ‘विश्वास’ मिळविण्यासाठी महाडिकांचे पॅचवर्क

Next

विश्वास पाटील ।
कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी थेट आपले विरोधक असलेल्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या घरी जाऊन राजकारणातील गुगलीच टाकली आहे. महाडिक यांच्या राजकारणाची ही शैलीच आहे. असे करताना ते कधीही त्याचे परिणाम काय होतील व त्याचा राजकीय फायदा-तोटा काय होईल, याचा विचार करीत बसत नाहीत. जिल्ह्णाच्या राजकारणावर गेली २५ वर्षे त्यांचा वरचष्मा राहण्यामागे त्यांची ही राजकीय शैलीच कारणीभूत आहे.

महाडिक यांनी हे करण्यामागे दोन-तीन महत्त्वाची कारणे आहेत. सध्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) मल्टिस्टेटचा मुद्दा गाजत आहे. त्यास फक्त आमदार सतेज पाटील यांच्याकडूनच नव्हे तर सभासदांकडूनही विरोध असल्याचे चित्र संपर्क सभेतून दिसत आहे. ‘गोकुळ’ हा महाडिक यांच्या राजकारणाचा व अर्थकारणाचाही मुख्य स्रोत आहे. मल्टिस्टेटचा विषय पेटला असताना त्यात पुन्हा बावडेकरांचा रोष ओढवून घेणे योग्य नव्हते. करवीरच्या संपर्क सभेत ज्यांना मारहाण झाली, ते विश्वास नेजदार हे वयाने ज्येष्ठ आहेत. महाडिक यांच्या एकतर्फी ताब्यात असलेल्या राजाराम कारखान्याचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे.

शिवाय त्यांनी ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याबद्दल त्यांचा अवमान होईल, असा अपशब्द वापरला नव्हता. असे असतानाही त्यांना मारहाण झाल्याने बावड्यातूनही त्याबद्दल संतप्त भावना व्यक्त झाल्या होत्या. नेजदारांना मारहाण हा विषय ‘बावडेकरांचा अपमान’ या दिशेने निघाला होता. बावडा हे राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक गाव आहे. गावाच्या अस्मितेला कोणी आव्हान देत आहे, असे चित्र तयार झाले असते तर ते महाडिक यांना ते परवडले नसते. महाडिक यांचे एकवेळ देवाचे फूल चुकेल; परंतु बावडा व राजाराम कारखाना येथील फेरी चुकत नाही. त्यामुळे तिथेच कारण नसताना तणाव निर्माण करणे बरे नव्हे, हे लक्षात आल्यामुळे त्यांनी थेट त्यांच्या घरी जाऊन त्याबद्दल जे झाले ते चुकीचेच होते, असे सांगून टाकले.

महाडिक राजकीयदृष्ट्या जेव्हा बॅकफुटवर जातात तेव्हा ते कुणाच्याही घरी जाऊन मनधरणी करण्यात अजिबात कमीपणा मानत नाहीत. त्यांचे आणि विनय कोरे यांचे राजकीय हाडवैर असतानाही गेल्या लोकसभा निवडणुकीत ते असेच कोरे यांच्या वारणेतील बंगल्यावर जाऊन धडकले होते. महाडिक यांच्यामुळे अनेकांना राजकीय फायदा झाला आणि पुढच्या टप्प्यात ते त्यांच्याविरोधात गेले तरीही महाडिक त्यांचा हिशेब करून त्यांना धडा शिकविण्याच्या कधी फंदात पडले नाहीत. त्यांच्या या गुणांमुळे प्रत्येक वेळेला कोण ना कोण त्यांच्या मदतीला धावून येतो. त्यामुळेच त्यांचा आजपर्यंतचा राजकीय सक्सेस रेट जास्त राहिला आहे. त्यामुळेच शुक्रवारी त्यांनी टाकलेली गुगली ही त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीस अनुसरून आहे.

असे काही करून लोकांत चर्चेत राहायला महाडिक यांना कायमच आवडते; त्यामुळे आपण सतेज पाटील यांच्या दारात किंवा नेजदार यांच्या घरात कसे जायचे, हा प्रश्न त्यांच्या मनाला पडला नाही. ज्यांना कुठे थांबायचे हे समजते त्यांचीच उडी उंच जाते, असे म्हटले जाते. राजकारणात एखादा प्रश्न वेळीच संपविणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते आणि महाडिक त्यात पटाईत आहेत. त्यांच्या या भेटीने नक्कीच काही प्रश्न सोडविले; पण त्याचवेळी काही नवे प्रश्न निर्माणही केले. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी ते असाच आणखी एखादा स्ट्रोक पुढच्या राजकारणात देतील, यात शंका नाही.


विश्वास पाटील यांचीही दिलगिरी
‘गोकुळ’ दूध संघाच्या करवीर तालुका संपर्क सभेत बुधवारी (दि. १२) प्रश्नोत्तरांवेळी राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांना चुकून झालेल्या धक्काबुक्कीबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी म्हटले आहे. संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी घडलेल्या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याने त्यांनीच पाटील यांना दिलगिरी व्यक्त करण्यास बजावले होते.

 

Web Title: Mahadik's patchwork to get 'trust' of Bavdekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.