महाडिक यांची आवाडेंना गळ
By admin | Published: March 19, 2017 12:31 AM2017-03-19T00:31:39+5:302017-03-19T00:31:39+5:30
इचलकरंजीत भेट : जिल्हा परिषदेचे राजकारण
इचलकरंजी : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सहकार्य करावे, यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. यावेळी सदस्य राहुल आवाडे उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तुम्हाला भेटीसाठी निरोप दिला असल्याचेही आमदार महाडिक यांनी सांगितले.
मंगळवारी (दि. २१) जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप यांनी आपापल्यापरीने दावा केला आहे; पण जिल्हा परिषदेत त्रिशंकू अवस्था असल्याने शिवसेना, कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध आघाड्या व अपक्षांना महत्त्व आले आहे. भाजपच्यावतीने आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांचे नाव निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार महाडिक यांनी आवाडे कुटुंबीयांची भेट घेतली. काँग्रेसने तुम्हाला वेळोवेळी डावलले आहे. तुम्ही तुमचे अस्तित्व दाखवून दिले आहे. ते कायम ठेवून काँग्रेसबरोबर न जाता आमच्या पाठीशी राहण्याची गळ घातली.
दरम्यान, याबाब राहुल आवाडे यांच्याशी संपर्क साधला असता योग्यवेळी निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले, तर येत्या दोन दिवसांत पालकमंत्री पाटील यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)