महाद्वार चौक राहणार रिकामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:22 AM2021-02-12T04:22:58+5:302021-02-12T04:22:58+5:30
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर येथील महाद्वार चौक आता फेरीवालामुक्त होणार आहे. गेल्या चार दिवसांपासून येथील कारवाईवरून फेरीवाले आणि महापालिका ...
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर येथील महाद्वार चौक आता फेरीवालामुक्त होणार आहे. गेल्या चार दिवसांपासून येथील कारवाईवरून फेरीवाले आणि महापालिका यांच्यामध्ये वाद सुरू होता. दोन्हीकडून गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली. महाद्वार चौकातील फेरीवाल्यांना याच परिसरात पुनर्वसन करण्यात येणार आहे. महाद्वार ऐवजी गरूड मंडपापासून १०० मीटर ग्राह्य धरल्यामुळे हा तोडगा निघाला.
महापालिका प्रशासनाकडून शहरातील अतिक्रमणावर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मंदिर, हॉस्पिटलच्या १०० मीटर परिसर फेरीवालामुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार महापालिकेेने कारवाई सुरू केली आहे. अंबाबाई मंदिरापासून १०० मीटर परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात येणार असल्याने सर्व फेरीवाल्यांनी विरोध केला. शिवाजी चौकात हजारो फेरीवाले एकत्र येऊन कारवाईला विरोध करण्याचा निर्धार केला. त्याच जागेवर व्यवसायावर फेरीवाले तर कारवाईवर प्रशासन ठाम होते. महापालिका प्रशासन कारवाईसाठी बुधवारी आल्यानंतर फेरीवाल्यांनी महाद्वार चौकात ठिय्या आंदोलन केले. यामुळे फेरीवाले आणि प्रशासनामध्ये वाद आणखीन चिघळला होता.
गुरुवारी सकाळपासून फेरीवाला कृती समिती आणि प्रशासनामध्ये तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. सायंकाळी ५ वाजता महाराणा प्रताप चौकात फेरीवाला कृती समिती आणि महाद्वार चौकातील फेरीवाले यांची बैठक झाली. यामध्ये कृती समितीने दोन पावले मागे येण्याचा निर्णय घेतला.
यावेळी आर. के. पोवार म्हणाले, सर्वांनी अडचणीत येण्यापेक्षा सर्वमान्य तोडगा काढावा लागणार आहे. ४० वर्षांपासून व्यवसाय करतो, आम्ही जागा सोडणार नाही, अशी भूमिका घेऊन चालणार नाही. प्रशासनालाही सहकार्य करावे लागणार आहे. महाद्वार चौक रिकामा करण्याचे त्यांचे आदेश आहेत. तेथील फेरीवाल्यांना त्याच परिसरात जवळच पुनर्वसन केले जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही. पुनवर्सन करणार आहे, तेथील फेरीवाल्यांनाही त्यांनी सामावून घ्यावे. नंदकुमार वळंजू म्हणाले, शहरातील वाहतुकीचाही विचार करावा लागेल. १० फेरीवाल्यांसाठी ५०० फेरीवाल्यांवर अन्याय होऊ नये. महाद्वार चौकापासून १० फूट रिकामा करून देण्यास हरकत नाही.
यानंतर आर. के. पोवार यांच्यासह फेरीवाला कृती समितीचे शिष्टमंडळ आणि महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, इस्टेट अधिकारी सचिन जाधव, पंडित पवार यांनी महाद्वार चौकात पाहणी केली. यावेळी महाद्वार चौक रिकामा करण्यावर एकमत झाले. तेथील फेरीवाल्यांना नजीकच पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला.
असा निघाला तोडगा
महापालिका प्रशासनाने सुरुवातील महाद्वारापासून रस्त्याच्या तिन्ही बाजूंनी १०० मीटर फेरीवाल्यांना अटकाव केला होता. ताराबाई रोडवरील मित्रप्रेम मंडळ रिक्षा स्टॉपपर्यंतचे फेरीवाल्यांना हटवावे लागत होते. फेरीवाला कृती समितीने गुरुवारी याला अक्षेप घेतला. मंदिरापासून १०० मीटर घेण्याची मागणी केली. यानुसार गरूड मंडपापासून १०० मीटर अंतर मोजण्यात आले. ताराबाई रोडवरील शेतकरी संघाच्या वस्तू भांडारपर्यंत १०० मीटर करण्यात आले. अखेर याला प्रशासनानेही सहमती दर्शवली. अशाच पद्धतीने महाद्वार रोडच्या दोन्ही बाजूस पट्टे मारण्यात आले. फेरीवाले आणी प्रशासनातील चार दिवस सुरू असणाऱ्या वादावर अखेर पडदा पडला. मंत्र्यांपर्यंत हा विषय गेला होता. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.
चौकट
मंदिर परिसरात फुले, नारळ, ओटी असे भक्तांना लागणारे साहित्य ठेवण्यास परवानगी आहे. त्यानुसार महाद्वार चौकातील अशा विक्रेत्यांवर कारवाई हाेणार नाही. यामध्ये महाद्वार चौकातील आवळे, रांगोळी विक्रेत्यांचाही समावेश असणार आहे. मात्र, त्यांना पट्ट्याच्या आतच व्यवसाय करावा लागणार आहे. रस्त्यावर आल्यास कारवाई केली जाणार आहे.
चौकट
दिलीप पवार यांनी खडसावले
फेरीवाला कृती समिती आणि प्रशासनाने गुरुवारी रात्री महाद्वार चौकात पाहणी करताना कृती समितीचे दिलीप पवार यांनी इस्टेट अधिकारी सचिन जाधव यांना खडसावले. १०० मीटरच्या अंतरावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. तसेच कपिलीर्थ मार्केटसमोरील एका फेरीवाल्यासोबतही महापालिका कर्मचाऱ्यांची वादावादी झाली.
फोटो : ११०२२०२१ कोल फेरीवाले आंदोलन
ओळी : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर येथील महाद्वार चौक रिकामा ठेवण्याच्या निर्णयावर फेरीवाले आणि प्रशासनामध्ये एकमत झाले. दोन्हीकडून रात्री उशिरा तेथे जाऊन पाहणी करण्यात आली. चार दिवसांनंतर अखेर वादावर पडदा पडला.