महाद्वार रोड हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:41 AM2017-10-15T00:41:45+5:302017-10-15T00:49:04+5:30
कोल्हापूर : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी शनिवारी अवघे कोल्हापूर जणू रस्त्यावर आले होते.
कोल्हापूर : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी शनिवारी अवघे कोल्हापूर जणू रस्त्यावर आले होते. शनिवारची बाजारपेठ आणि दिवाळीची खरेदी हा योग जुळवून आलेल्या नागरिकांची महाद्वार रोडवर अलोट गर्दी झाली होती.
यंदा गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी हे वर्षातील सर्वांत मोठे सण केवळ पंधरा दिवसांच्या अंतरावर आल्याने नवरात्रौत्सवानंतर गेले काही दिवस बाजारपेठेत शांतता होती. मात्र सात तारखेनंतर सर्वांचेच पगार, बोनस, व्यावसायिकांची बिले अशा रकमा हातात आल्याने जीएसटीच्या भारामुळे मरगळलेल्या बाजारपेठेला खरेदीच्या उत्साहाचे टॉनिक मिळाले. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून खरेदीला सुरुवात झाली. कोल्हापुरात शनिवारी बाजारपेठा बंद असतात. मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवली; तर शनिवारी रस्त्यावर भरणाºया बाजाराने नागरिकांना कमी किमतीत अनेकविध प्रकारच्या वस्तूंचा जणू खजिनाच खुला करून दिला.
दुपारपासूनच महाद्वार रोडवर शहरातील नागरिकांसोबतच ग्रामीण भागातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी केली होती. ही गर्दी लक्षात घेऊन महाद्वार रोडला जोडणारे रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. आबालवृद्धांचे आकर्षक कपडे, छोटे आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या, बांगड्या, विविध प्रकारच्या इमिटेशन ज्वेलरी, लक्ष्मीपूजनाचे साहित्य, घरसजावटीच्या वस्तू, चपला अशा अनेक प्रकारच्या साहित्याने महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटीचा परिसर फुलला होता; तर पापाची तिकटीचा परिसर नावीन्यपूर्ण आकाशकंदिलांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. सायंकाळी या रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती इतकी अलोट गर्दी झाली होती.
फराळाचा दरवळ
दिवाळी म्हटलं की गोल, गोड लाडू, खुसखुशीत शंकरपाळी, खमंग चकल्या, जिभेला चटका देणाºया तिखट वड्या, चटपटीत चिवडा... अशी फराळाची यादी वाढतच जाते. घरोघरी बनविल्या जाणाºया या फराळाचा घमघमाट आता कोल्हापुरातील गल्लीबोळांमध्ये पोहोचला आहे. हा फराळ बनविण्यासाठी सुगरण गृहिणींचा अख्खा दिवस आता स्वयंपाकघरामध्ये चालला आहे; तर नोकरदार व उद्योगी महिलांनी आपला ताण थोडा हलका करीत तयार फराळाला प्राधान्य दिले आहे.
किल्ल्यांची बांधणी
दिवाळी आणि किल्ले यांचे अतूट बंधन असते. बाजारात तयार मिळणाºया आकर्षक किल्ल्यांपेक्षा दगडमातीने स्वत:च्या हातांनी बनविलेला किल्ला मुलांना अधिक आनंद देतो. परीक्षेच्या तणावातून शनिवारी मुक्त झालेल्या बालचमूने आता दारात किल्ला उभारण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे ते आपल्या घराच्या दारात दगड, माती व विटांनी किल्ला बनवितात आणि त्याची सुरेख सजावटही करतात; त्यामुळे बालचमू आपापल्या दारात किल्ले बनविण्यात मग्न झाले आहेत.