‘महागाव’ला ५४ वर्षांनंतर मिळणार ‘सभापतिपद’ गडहिंग्लज पंचायत समिती : तपानंतर शिप्पूरला उपसभापतिपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:48 PM2018-09-13T23:48:19+5:302018-09-13T23:48:25+5:30
राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक असणाऱ्या महागावला यावेळी तब्बल ५४ वर्षांनंतर सभापती पद मिळणार आहे.
राम मगदूम ।
गडहिंग्लज : राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक असणाऱ्या महागावला यावेळी तब्बल ५४ वर्षांनंतर सभापती पद मिळणार आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे पहिले सभापती दिवंगत शिवगोंडराव आण्णासाहेब पाटील यांच्यानंतर सभापती होण्याचा बहुमान त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विजयराव पाटील यांना मिळणार आहे. तसेच शिप्पूर तर्फ नेसरी या गावालाही तब्बल एक तपानंतर उपसभापतिपद मिळणार आहे. माजी उपसभापती आनंदराव मटकर यांच्यानंतर युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष विद्याधर बाबूराव गुरबे यांना ही संधी मिळणार आहे. १८ सप्टेंबरच्या विशेष सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब होईल.
१ मे १९६२ ला गडहिंग्लज पंचायत समितीची स्थापना झाली. त्यावेळी तालुक्यावर काँगे्रसचे आणि तत्कालीन जिल्ह्याचे नेते देशभक्तरत्नाप्पाण्णा कुंभार यांचा मोठा प्रभाव होता. स्व. शिवगोंडराव हे त्यांचे अनुयायी होते. त्यांचे नेतृत्वगुण आणि संघटन कौशल्य विचारात घेऊनच तत्कालीन नेत्यांनी त्यांना सभापतिपदाची संधी दिली, त्यांनी ती लीलया पेलली. त्यानंतर आजतागायत सभापतिपदाची संधी महागावला मिळालेली नव्हती; परंतु योगायोगाने स्व. शिवगोंडराव यांचे सुपुत्र विजयराव यांच्या रूपाने सभापतिपदाचा मान यावेळी पुन्हा महागावला मिळणार आहे.
१९६२ ते १९६४ अखेर शिवगोंडराव हे सभापती होते. त्यानंतर उपसभापती म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांचे सख्खे बंधू वीरगोंडराव यांनी तब्बल ११ वर्षे उपसभापती म्हणून काम केले.
तद्नंतर वीरगोंडराव यांचे सुपुत्र विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांना २००२ ते २००५ अखेर उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली.दरम्यान, २००५ मध्ये अप्पी पाटील यांना जिल्हा परिषदेवरकाम करण्याची संधी मिळाली. तत्पूर्वी अॅड. हणमंतराव पाटील यांनीही जिल्हा परिषदेवर महागावचे प्रतिनिधित्व केले; परंतु सभापतिपदाचा बहुमान स्व. शिवगोंडराव यांच्याखेरीज गावात कुणालाही मिळालेला नव्हता.
दीड वर्षापूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत स्व. शिवगोंडराव यांचे सुपुत्र विजयराव हे ताराराणी आघाडीतर्फे निवडून आले. त्यावेळी पहिल्या टप्प्यातच त्यांना सभापतिपदाची संधी देण्याचे वचन नेत्यांनी दिले होते. त्याचे पालन झाले नाही म्हणूनच त्यांनी मावळत्या सभापती जयश्री तेली यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला; परंतु तेली यांनी राजीनामा दिल्यामुळे विजयराव यांच्या सभापतिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘बाबां’नंतर ‘तार्इं’मुळे बहुमान..!
२००२ ते २००५ या कालावधीत स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी अप्पी पाटील यांना उपसभापती म्हणून काम करण्याची संधी दिली होती. यावेळी त्यांचे सख्खे चुलत बंधू विजयराव यांना सभापतिपदाचा बहुमान मिळणार आहे. त्यासाठीस्व. कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी सध्या अप्पी पाटील राष्ट्रवादीसोबत नसतानाही दीड वर्षापूर्वी केलेली भाजपसोबतची आघाडी तोडली आहे.
महागावला मिळालेले सन्मान
शिवगोंडराव आण्णासाहेब पाटील (सभापती, १९६२-६७)
शिवगोंडराव आण्णासाहेब पाटील (उपसभापती, १९६७-७३)
वीरगोंडराव आण्णासाहेब पाटील (उपसभापती, १९७९-९०)
विनायक वीरगोंडराव पाटील (उपसभापती, २००२-०५)