मराठा समाजाची बुधवारी महागोलमेज
By admin | Published: April 16, 2017 01:01 AM2017-04-16T01:01:02+5:302017-04-16T01:01:02+5:30
मराठा आरक्षण प्रश्न : आंदोलनाची दिशा ठरणार; असंख्य मोर्चे निघूनही शासनाने दुर्लक्ष केल्याची टीका
कोल्हापूर : सकल मराठा समाजाने आपल्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र व इतर राज्यांत लाखोंच्या संख्येने शांततेत सुमारे ५८ मूक मोर्चे काढले; पण शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सकल मराठा समाज एकत्र येऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात बुधवारी (दि. १९) महागोलमेज परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजीव पाटील आणि उपाध्यक्ष जयेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही परिषद येथील मार्केट यार्डमधील मुस्कान लॉन येथे सकाळी १०.३० वाजता सुरू होईल व ती दिवसभर चालेल. क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्सने पुढाकार घेऊन तिचे आयोजन केले आहे. त्याचदिवशी दुपारी ४.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे.
सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापुरात यापूर्वी पहिली गोलमेज परिषद झाली, त्यानंतरच आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्यानंतरच राज्यभर व राज्याच्या बाहेरही सकल मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे शांततेत निघाले; पण शासनाने कोणताही निर्णय दिलेला नाही. मोर्चानंतर राज्यात विविध निवडणुका लागल्यामुळे सकल मराठा समाज शांत राहिला. त्यामुळे मोर्चानंतर पुढे काय अशी विचारणा राज्यभरातून होत होती.
त्याचा म्हणून पुढे कसे जायचे याचा कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठीच पुन्हा महागोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोन पसरू लागले आहे, तर कोपर्डीसारख्या घटना घडल्याने कोल्हापूरच महागोलमेज परिषदेसाठी निवडल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत न्यायालयात सुरूअसलेल्या लढ्याबाबत या महागोलमेज परिषदेत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेस सचिव राजीव लिंग्रस, दिलीप पाटील, दिलीप देसाई, प्रशांत पाटील, माजी महापौर बाजीराव चव्हाण, उमेश पोवार, विजयराव जाधव, उत्तम कोराणे, विक्रांत पोवार, रणजित जाधव, प्रसाद पाटील, नितीन सासने, जयदीप जाधव, किशोर कदम, शिवाजी पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महागोलमेज परिषदेसाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्णातील विविध संघटनेचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी व सकल मराठा संघाच्या चार प्रतिनिधींना खास निमंत्रित केले असून, ५०० लोक उपस्थित राहतील.
परिषदेतूनच १०० जणांची समिती निर्माण करण्यात येणार आहे. ही समिती शासन स्तरावर दबावगट म्हणून राहणार असून, न्यायाबाबत पाठपुरावा करणार आहे.
परिषदेतील चर्चेचे मुद्दे
१ मराठा समाज विद्यार्थ्यांची फी माफी व शैक्षणिक खर्च शासनाकडे मागणी करण्यासाठी ठराव करणे.
२ मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात असणाऱ्या दाव्यात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी शासनावर दबाव टाकणे व त्यांना पूरक माहिती देण्यासाठी खास गट निर्माण करणे.
३ शेतीमालास हमीभाव, कर्जमाफीबाबत चर्चा करून धोरण ठरविणे तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणे.
४ मराठा समाजात प्रबोधनाचा कृती कार्यक्रम ठरविणे. लग्न समारंभ व मृत्यूनंतरच्या धार्मिक समारंभात जी उधळपट्टी केली जाते त्याबाबत जनजागृती करणे.
५ सोशल मीडियाची आचारसंहिता एकमताने ठरविणे.
६ मराठा समाजातील महिला, मुली हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा मागणी नको याबाबत चर्चा करून ठराव करणे.
७ कोपर्डीसारखे अनेक अत्याचार रोखण्यासाठी ठोस निर्णय घेऊन ठराव करणे.
८ अॅट्रॉसिटीचे खोटे निर्णय रोखण्यासाठी चर्चा करून ठोस निर्णय घेणे. असे खोटे गुन्हे जिथे दाखल होतील, तिथे समाजातर्फे नामांकित वकील देण्याबाबत विचार करणे.
नेतृत्व ठरणार..
या महागोलमेज परिषदेत दिवसभर चर्चा, ठराव, निर्णय, कृती व कार्यक्रम ठरविला जाणार आहे. सकल मराठा समाजातर्फे जे राज्यभर मोर्चे निघाले, त्यास कुणाचे नेतृत्व नव्हते.
ती समाजाने व्यक्त केलेली उस्फूर्त प्रतिक्रिया होती. परंतू असा नेतृत्वहीन समाज पुढे नेणे शक्य नाही. त्यामुळे हे आंदोलन कुणाच्या नेतृत्वाखाली आकार घेईल याचा महत्वाचा निर्णय या परिषदेत घेतला जाणार आहे. त्यासाठी एक राज्यव्यापी समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे.
राणेंसह कुणालाही निमंत्रण नाही
महागोलमेज परिषदेसाठी मराठा आरक्षण अभ्यास समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह कोणत्याही राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले नसल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.