महाअवयव दानाची होणार ‘जनजागृती’
By Admin | Published: August 23, 2016 12:12 AM2016-08-23T00:12:59+5:302016-08-23T00:32:43+5:30
३० आॅगस्ट ते एक सप्टेंबर अभियान : नियोजनासाठी जिल्हाधिकारी सैनी यांची बैठक
कोल्हापूर : अवयव दान हे श्रेष्ठदान असून, अवयव दानाबद्दल जनजागृती करण्यासाठी ३० आॅगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीमध्ये महाअवयव दान अभियान हाती घेण्यात आले आहे. हे महाअवयव दान अभियान जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सोमवारी दिल्या.
या अभियानाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी बैठक घेण्यात आली.
३० आॅगस्टला बिंदू चौकातून सकाळी नऊ वाजता जनजागृती महाअवयव दान अभियानांतर्गंत रॅली निघणार आहे. या रॅलीत समाजातील सर्व घटक सहभागी होतील, तसेच तालुका स्तरावरही रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील महाविद्यालय स्तरांवर वक्तृत्व, रांगोळी, वाद-विवाद, निबंध, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी मेडिकल कॉलेज, एनएसएस, नर्सिंग कॉलेज, सामाजिक संस्थांचा सहभाग घ्यावा. अवयव दानाबाबत जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी दिल्या. यावेळी डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. एल. एस. पाटील, डॉ. अरुण वाडेकर, डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. व्ही. ए. देशमुख, आदी उपस्थित होते.
राज्यात एकाचवेळी अभियान...
देशात सुमारे पाच लाख विविध आजारांच्या रुग्णांना अवयवाची गरज आहे. मात्र, पाच हजार अवयव दानाची उपलब्धता आहे. समाजात अवयव दानाबाबत जनजागृती कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारने एकाचवेळी हे अभियान राबविण्याचे नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून हे अभियान होत आहे.