महाजनादेश यात्रा सोमवारी कोल्हापुरात : तयारीसाठी भाजपाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 03:31 PM2019-09-09T15:31:49+5:302019-09-09T15:36:03+5:30
राज्यातील भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा सोमवारी (दि. १६) व मंगळवारी (दि. १७) कोल्हापुरात येत आहे. या यात्रेचे स्वागत प्रचंड जनसमुदायाद्वारे करून या निमित्ताने संघटनशक्ती दाखवा, असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले.
कोल्हापूर : राज्यातील भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा सोमवारी (दि. १६) व मंगळवारी (दि. १७) कोल्हापुरात येत आहे. या यात्रेचे स्वागत प्रचंड जनसमुदायाद्वारे करून या निमित्ताने संघटनशक्ती दाखवा, असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले.
महाजनादेश यात्रेच्या स्वागताबरोबरच तयारीसंदर्भात शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू हॉल येथे भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थावरून बोलत होते. प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटनमंत्री बाबा देसाई, सरचिटणीस विजय जाधव आदींची होती.
आमदार हाळवणकर यांनी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने ही यात्रा यशस्वी होईल, यात शंका नाही; त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या तालुकानिहाय कामकाजाच्या वेळापत्रकानुसार काम करावे, असे सांगितले.
महेश जाधव यांनी शहरात ही यात्रा येत असून, शहरातील सर्व मंडल अध्यक्ष, नगरसेवक, बूथ प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने यात्रा मार्गावर उपस्थित जोरदार स्वागत करावे, अशा सूचना दिल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे ही यात्रा वेगळी करण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल चिकोडे म्हणाले, ‘यात्रेमध्ये कोणत्या पदाधिकाऱ्यांने कोणती जबाबदारी पार पाडायची हे सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे तयारी करावी,’ असे सांगितले. बाबा देसाई यांनी यात्रेसाठी जिल्ह्यातून उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांसह जनतेच्या सहभागाच्या संख्येचा आढावा घेऊन त्याची नोंद घेतली.
यावेळी पी. जी. शिंदे, के. एस. चौगुले, आर. डी. पाटील, अजित ठाणेकर, किरण नकाते, विजयसिंह खाडे-पाटील, जयश्री जाधव, संतोष भिवटे, अजिंक्य चव्हाण, मारुती भागोजी, गणेश देसाई, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, सुरेश जरग, विजय आगरवाल, भरत काळे, चंद्रकांत घाटगे, आदी उपस्थित होते.
यात्रा मार्गावर झेंडे, फलक लावून वातावरण निर्मिती
भाजपातर्फे यात्रा मार्गावर ध्वज, बोर्ड लावून वातावरण निर्मिती करण्यात येणार असल्याचे महेश जाधव यांनी सांगितले, तसेच सर्वांनी ही यात्रा नेटक्या नियोजनाद्वारे वेळापत्रकानुसार पार पाडावी, असे आवाहनही केले.