महाकाली देवी उत्सव साधेपणाने, पालखी सोहळाही रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 06:27 PM2021-05-20T18:27:02+5:302021-05-20T18:28:24+5:30
CoronaVIrus Kolhapur : कोल्हापूर येथील शिवाजी पेठेतील साकोली परिसरात असलेल्या श्री महाकाली देवाचा उत्सव यंदा साध्या पद्धतीने व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऐन उत्सवाच्या काळात गुरुवारी देवीचे मंदिर बंद ठेवण्यात आले, तर शुक्रवारी सायंकाळी प्रतिवर्षी होणारा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे.
कोल्हापूर : येथील शिवाजी पेठेतील साकोली परिसरात असलेल्या श्री महाकाली देवाचा उत्सव यंदा साध्या पद्धतीने व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऐन उत्सवाच्या काळात गुरुवारी देवीचे मंदिर बंद ठेवण्यात आले, तर शुक्रवारी सायंकाळी प्रतिवर्षी होणारा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे.
श्री करवीर क्षेत्र माहात्म्य तसेच पौराणिक ग्रंथातून श्री महाकाली देवाचे वर्णन केले आहे. करवीर क्षेत्री आसुरांनी उन्माद मांडला होता, तेव्हा महाकाली देवीने श्री अंबाबाईच्या साक्षीने आसूरांचा वध केला करून भाविकांचे रक्षण केले होते. या देवीचे पौराणिक व प्राचीन मंदिर साकोली कॉर्नर परिसरात आहे. अनेक वर्षांपासून या मंदिरात महाकाली देवीचा उत्सव होत आहे. अक्षय तृतीयापासून हा उत्सव सुरू होऊन तो नवमीला पालखी सोहळ्याने समाप्त होतो.
यंदा देवीच्या उत्सवातील पारंपरिक धार्मिक विधी रद्द करण्यात आले आहेत. नित्योचाराप्रमाणे अष्टमीच्या दिवशी देवीला गुरुवारी सकाळी महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर महापूजा बांधण्यात आली. ही पूजा ओंकार गुरव यांनी बांधली. दुपारी बारा वाजता महाआरती होऊन देवीला पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हे धार्मिक विधी पार पडले. नवचंडी यज्ञ व महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
प्रतिवर्षी उत्सवात नवमी दिवशी सायंकाळी पाच वाजता महाकाली देवीचा पालखी सोहळा होता. या सोहळ्यात हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात; परंतु यावर्षी शुक्रवारी होणारा हा सोहळाच रद्द करण्यात आला आहे. फक्त नियमानुसार पालखी पूजन होणार आहे.