म्हाकवेकरांना गोकुळ प्रतिनिधित्वाची ‘आस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:36+5:302021-04-02T04:23:36+5:30
दत्ता पाटील म्हाकवे : जिल्ह्यात मोठ्या संस्थांपैकी एक असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा धुरळा उडत आहे. यामध्ये ...
दत्ता पाटील
म्हाकवे : जिल्ह्यात मोठ्या संस्थांपैकी एक असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा धुरळा उडत आहे. यामध्ये कागल तालुक्यातून ३८३ दूध संस्थांचे प्रतिनिधी मतदानासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हाकवे गावातून तब्बल १३ संस्थांचे प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असणाऱ्या या गावाला जिल्हास्तरावरील अनेक पदे मिळाली आहेत. मात्र, तब्बल ३५ वर्षांपासून गोकुळच्या प्रतिनिधित्वाची आस कायम राहिली आहे.
दरम्यान, १९८० च्या दशकात म्हाकवे गावाला बंडोपंत कुंडलिक पाटील यांच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीला गोकुळ दूध संघात संचालकपदाची संधी मिळाली. त्यामुळे पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्व प्राप्त झाले. त्यांनी पुढील दहा वर्षे कोल्हापूर बाजार समितीत स्थान मिळविले. यामध्ये पाच वर्षे त्यांना सभापती होता आले. गतवेळी आशालता आनंदराव पाटील यांना बाजार समितीमध्ये संधी मिळाली. परंतु, त्यानंतर गोकुळसाठी उमेदवारीचाही विचार झालेला नाही.
लहान गावातही ठरावांची संख्या अधिक : टोकाची राजकीय ईर्षा आणि अंतर्गत गटबाजीमुळे लहान गावातही दूध संघांची संख्या वाढली आहे. सहकारामुळे तालुक्यातील आर्थिक चक्राला गती मिळाली आहेच. शिवाय राजकीय वरचष्माही राहिला आहे. साके येथे (१०), बाचणी (९), मळगे बुद्रुक, सिद्धनेर्ली (८), शिंदेवाडी, बस्तवडे (७), कागल, कुरुकली, गोरंबे, व्हनाळी, एकोंडी (६) येथील दूध संस्था प्रतिनिधी पात्र आहेत.