महालक्ष्मी बँकेला साडेपाच कोटींचा करपूर्व नफा, विनोद डिग्रजकर यांची माहिती : इंटरनेट बँकिंगकडे वळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:19 AM2021-04-03T04:19:56+5:302021-04-03T04:19:56+5:30
(फोटो : ०२०४२०२१-कोल-विनोद डिग्रजकर) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील महालक्ष्मी बँकेला गत आर्थिक वर्षात कोरोनाचे संकट असतानाही ५ ...
(फोटो : ०२०४२०२१-कोल-विनोद डिग्रजकर)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील महालक्ष्मी बँकेला गत आर्थिक वर्षात कोरोनाचे संकट असतानाही ५ कोटी ६५ लाख रुपयांचा करपूर्व नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर यांनी दिली. प्रतिकूल परिस्थितीतही बँकेला एनपीए शून्य टक्के ठेवण्यात यश मिळाले आहे.
गतवर्षात आर्थिक मंदी, लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांवर झालेला परिणाम असे एक ना अनेक अडचणी होत्या. तरीही बँकेने चांगली सेवा व विश्वासार्हतेच्या बळावर चांगला व्यवसाय केला. सभासदांचे पाठबळही त्यासाठी महत्त्वाचे ठरल्याचे डिग्रजकर यांनी सांगितले.
बँकेची एकूण कर्जे ३६५ कोटींच्यावर असून, एकूण ठेवी ६७२ कोटींच्या आहेत. बँकेची वार्षिक उलाढाल एक हजार कोटींहून जास्त आहे. राज्य कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेचा आर्थिक पाया मजबूत आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १७ टक्क्यांच्यावर असून, सीडी रेशो ५५ टक्क्यांवर आहे. नव्या वर्षात सॉफ्टवेअर बदलून इंटरनेट बँकिंगच्या जास्तीत जास्त सुविधा देण्याचा बँकेचा मानस आहे. सर्व संचालक मंडळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर किंकर व सर्व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नामुळेच चांगला व्यवसाय करण्यात यश आल्याचे बँकेने म्हटले आहे. बँकेचे सुमारे २५ हजारांहून जास्त सभासद असून, जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रमुख बँक अशी ओळख आहे.