महालक्ष्मी एक्स्प्रेस दीड महिन्यानंतर पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:38+5:302021-07-02T04:16:38+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली कोल्हापूर ते मुंबई (महालक्ष्मी एक्स्प्रेस) ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली कोल्हापूर ते मुंबई (महालक्ष्मी एक्स्प्रेस) पुन्हा गुरुवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी प्रवाशांनीही चांगला प्रतिसाद देत ६० टक्क्यांहून अधिक आरक्षण केले होते.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर मध्य रेल्वेने कोल्हापूरची लाईफलाईन अर्थात महालक्ष्मी एक्स्प्रेस १५ एप्रिल २०२१ नंतर बंद केली. त्यामुळे मुंबईला अत्यावश्यक सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केवळ कोयना एक्स्प्रेसवर अवलंबून राहावे लागले. कोरोनाचा संसर्ग आणखी वाढल्यानंतर कोयना एक्स्प्रेस बंद करून केवळ महाराष्ट्र एक्स्प्रेस व हरिप्रिया एक्स्प्रेस या दोनच एक्स्प्रेस सुरू ठेवण्यात आल्या. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना एसटीबसचा आधार घ्यावा लागला. त्याही अत्यावश्यक सेवा आणि कोरोनाच्या भीतीमुळे मर्यादित स्वरूपात धावत होत्या. या सर्वाचा परिणाम म्हणून व्यवसायानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. याबाबत मध्य रेल्वे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य आनंद माने व शिवनाथ बियाणी यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याशी संर्पक साधून कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याची माहिती दिली. राज्य व केंद्र सरकारच्या कोरोना निर्बंध काही अंशी शिथिल झाल्यानंतर गुरुवारी रात्री साडेआठ वाजता पुन्हा कोल्हापुरातून ही रेल्वे सुरू झाली. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी चांगला प्रतिसाद देत ६० टक्के आरक्षण केले होते.
(फोटो रात्री पाठवत आहे)