महालक्ष्मी, महाराष्ट्र एक्स्प्रेस जूनअखेरपर्यंत रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:26 AM2021-05-07T04:26:41+5:302021-05-07T04:26:41+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मध्य रेल्वेने गेल्या दीड महिन्यापूर्वी काही मार्गांवरील रेल्वे रद्द केल्या. त्यानुसार गेल्या महिन्याभरापूर्वी कोल्हापूर-नागपूर मार्गावर ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मध्य रेल्वेने गेल्या दीड महिन्यापूर्वी काही मार्गांवरील रेल्वे रद्द केल्या. त्यानुसार गेल्या महिन्याभरापूर्वी कोल्हापूर-नागपूर मार्गावर दर सोमवारी आणि शुक्रवारी धावणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. ही रेल्वे दि. २८ जूनपर्यंत रद्द असणार आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस दि. २६ एप्रिल ते दि. १० मे पर्यंत रद्द करण्यात आली. ती आता मध्य रेल्वेच्या नव्या निर्णयानुसार दि. ३० जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचे प्रमुख ए. आय. फर्नांडीस यांनी गुरुवारी दिली.
चौकट
चौथ्यावेळी ‘कोल्हापूर-धनबाद’ रेल्वे फुल्ल
कोल्हापूर-धनबाद (दीक्षाभूमी) रेल्वे सलग चौथ्या आठवड्यात फुल्ल राहिली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि रोजगार बंद असल्याने कोल्हापुरातील औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणारे मजूर हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत या रेल्वेने आपापल्या गावाच्या दिशेने जात आहे. कोल्हापुरातून शुक्रवारी पहाटे निघणाऱ्या या रेल्वेसाठी १२५० प्रवाशांनी तिकीट आरक्षण केले होते, तर २०० प्रतीक्षा यादीत होते. रेल्वे स्थानकाबाहेर गुरुवारी सायंकाळपासून परराज्यांत जाणारे प्रवासी थांबून होते. त्यातील सुमारे पाचशे जणांना व्हाईट आर्मीच्यावतीने जेवण देण्यात आले.