‘जय भवानी’वर महालक्ष्मी आघाडीचे वर्चस्व

By Admin | Published: October 4, 2015 11:16 PM2015-10-04T23:16:19+5:302015-10-04T23:54:01+5:30

सर्व जागा जिंकल्या : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत दहा वर्षांची सत्ता उलथवली

Mahalaxmi Alliance dominates 'Jai Bhavani' | ‘जय भवानी’वर महालक्ष्मी आघाडीचे वर्चस्व

‘जय भवानी’वर महालक्ष्मी आघाडीचे वर्चस्व

googlenewsNext

आमजाई व्हरवडे : संपूर्ण भोगावती परिसराचे लक्ष लागून राहिलेल्या आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील जय भवानी विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ जयभवानी आघाडीने सर्व बारा जागा जिंकत दहा वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. संस्थेच्या प्रगतीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येवून सत्तारूढ गटाला हादरा देण्याचा निर्णय घेतला. या नेत्यांच्या समझोता एक्स्प्रेसला सर्वसामान्य मतदारांनीही पाठबळ दिले. सत्तारूढ गटाने गावाच्या बाहेरील व्यक्तींना संस्थेचे सभासदत्व करून घेतल्याने गावात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. बाहेरील सभासदांचाच या निवडणुकीत कळीचा मुद्दा झाला होता. सत्तारूढ गटाने जवळपास दोनशेपेक्षा अधिक मतदार वाढवल्याने निवडणूक रंगतदार झाली. संस्थेच्या कारभाराबाबतही विरोधकांनी सत्तारूढ गटावर टीकास्त्र सोडले होते. शनिवारी झालेल्या निवडणुकीत बारा जागांसाठी चार अपक्षांसह दोन्ही पॅनेलचे अठ्ठावीस उमेदवार रिंंगणात होते. महालक्ष्मी विकास आघाडीचे शंभरच्या आसपास मताधिक्क्य घेऊन सर्व बारा जागा जिंकल्या व दहा वर्षांनंतर सत्ता हस्तगत केली. विरोधी आघाडीच्या समर्थकांनी फटाक्यांची व गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. बी. पाटील यांनी काम पाहिले. राधानगरीचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस पाटील अशोक पाटील उपस्थित होते. विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेतृत्व विष्णुपंत चौगले, यशवंत चव्हाण, बापूसो लिंगडे, शंकर पाटील, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश पाटील, राजेंद्र चौगले, डॉ. सुभाष पाटील, मुकुंद पाटील, बी. डी. पाटील, अरूण पाटील, विलास चौगले, हिंदुराव कांबळे, आदींनी तर सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व मधुकर वरूटे, पंडित चव्हाण, अशोक लिंगडे, बाजीराव चौगले यांनी केले.

गावाने दिले गावाने घेतले
गेल्या तीन वर्षांपूर्वी आमजाई व्हरवडे गावाने ग्रा. पं. निवडणूक बिनविरोध करून मधुकर वरूटे दांपत्याला सरपंच व उपसरपंचपदे देऊन जिल्ह्यात एक इतिहास केला होता. मात्र वरूटेंनी विकासकामच केले नसल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी विकास संस्थेतून वरूटेंना हद्दपार करून सत्ता भोगण्यास लायक नसल्याचेच दाखवून देत आगामी ग्रा. पं. च्या निवडणुकीला वरूटेंना धोक्याची घंटा दिली आहे. त्यामुळे गावाने दिले तसे गावाने घेतले, असे म्हणण्याची वेळ आली.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण गट - विलास आनंदराव चौगले (३६९), मुकुंद पांडुरंग पाटील (३६९), अरूण शिवाजी चौगले (३६२), दत्तात्रय बंडोपंत पाटील (३४३), बाबूराव दादू पाटील (३२७), अंकुश संभू पाटील (३३१), कोंडीबा बाळू पाटील (३२४), आनंदा महिपती रणदिवे (३२०), महिला प्रतिनिधी द्रोपदी विष्णू पाटील (३६३), संगीता बाळासो पाटील (३२१) मागासवर्गीय प्रतिनिधी राजाराम सखाराम कांबळे (३४१), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी रघुनाथ केरबा टिपुगडे (३२७).

Web Title: Mahalaxmi Alliance dominates 'Jai Bhavani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.