महालक्ष्मीची उत्सवमूर्ती आता सुतारवाड्यात
By admin | Published: February 10, 2015 12:12 AM2015-02-10T00:12:34+5:302015-02-10T00:30:38+5:30
पारंपरिक पद्धतीने मूर्ती वाजत-गाजत सुतारवाड्याकडे नेण्यात आली. त्याठिकाणी मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
गडहिंग्लज : १५ वर्षांनंतर १ ते ७ मे दरम्यान होणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर खातेदार पाटलांच्या वाड्यातील श्रींची उत्सवमूर्ती मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने सवाद्य मिरवणुकीने सोमवारी सायंकाळी सुतारवाड्यात नेण्यात आली.
दुपारी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, यात्रा समितीचे अध्यक्ष रमेश रिंगणे, बड्याचीवाडीच्या सरपंच गीता देसाई, सर्व नगरसेवक, पंच व मानकरी, आदी मंडळी सवाद्य मिरवणुकीने पाटील वाड्याकडे निघाली. नेहरू चौक, बाजारपेठ, वीरशैव बँक, मेनरोड, दसरा चौक, लक्ष्मी रोड मार्गे मिरवणूक शिवाजी चौकातील पाटील वाड्यात आली. त्या ठिकाणी सहायक जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, तहसीलदार हनुमंत पाटील व गटविकास अधिकारी चंचल पाटील यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन व आरती झाली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने मूर्ती वाजत-गाजत सुतारवाड्याकडे नेण्यात आली. त्याठिकाणी मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
मिरवणुकीत उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, यात्रा समिती उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, सचिव अर्जुन भोईटे, खजिनदार काशिनाथ देवगोंडा, कार्याध्यक्ष दत्ता बरगे, सहकार्याध्यक्ष शिवाजीराव खणगावे, बाळासाहेब मोरे व अरुण बेल्लद, सहसचिव चंद्रकांत सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष मारुती राक्षे, सरचिटणीस अनिल खोत, सोमगोंडा आरबोळे, नगरसेविका अरुणा शिंदे, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
गुलालाची उधळण... पुष्पवृष्टी
‘श्रीं’ची उत्सवमूर्ती पारंपरिक पद्धतीने सुतारवाड्याकडे नेताना काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गुलालाची उधळण करण्यात आली. सुतारवाड्यासमोर पोहोचल्यानंतर मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.