लक्ष्मीसेन जैन मठात मंगलमय वातावरणात महामस्तकाभिषेक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 12:20 PM2022-05-23T12:20:50+5:302022-05-23T12:21:09+5:30
लक्ष्मीसेन महास्वामीजी यांचे निर्वाण आणि कोरोना यामुळे तब्बल चार वर्षे हा सोहळा झाला नव्हता. रविवारी चार वर्षांची सर्व कसर भरून काढत अतिशय उत्साहात श्रावकांनी महामस्तकाभिषेकांची ही शेकडो वर्षांपासूनची परंपरा पूर्ववत केली.
कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन जैन मठात वार्षिक महामस्तकाभिषेक सोहळा रविवारी संध्याकाळी मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. लक्ष्मीसेन महास्वामीजी यांचे निर्वाण आणि कोरोना यामुळे तब्बल चार वर्षे हा सोहळा झाला नव्हता. रविवारी चार वर्षांची सर्व कसर भरून काढत अतिशय उत्साहात श्रावकांनी महामस्तकाभिषेकांची ही शेकडो वर्षांपासूनची परंपरा पूर्ववत केली.
लक्ष्मीसेन जैन मठ हा कोल्हापुरातील अति प्राचीन आणि प्रथम भट्टारक धर्मगुरुपीठ करवीर काशी म्हणून ओळखला जातो. येथे दिल्ली कोल्हापूर जिनकंची पेनगुंडी चतूर सिद्ध सिंहासनाधीश्वरांना श्रीमंत परमपुज्य भट्टारकरत्न पट्टाचार्य स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर रायबाग होसूर (बेळगाव) अशा धर्मगुरू प्रथम भट्टारक पीठाच्या प्रांगणामध्ये २८ फूट उंचीची खडगासनस्थित बृहत मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळ्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या किंंवा चौथ्या रविवारी याचे आयोजन केले जाते.
गेल्या चार वर्षांपासून मात्र ही परंपरा खंडित झाली होती. रविवारी संध्याकाळी श्रावकांच्या उपस्थितीत ही परंपरा पुन्हा सुरू झाली. तीर्थंकर बृहत मूर्तीचा महामस्तकाभिषेक करण्यासाठी श्राविकांची रांग लागली होती. दूध, उसाचा रस, हळद, कुंकूम, सर्वोषध, कलक चूर्ण, तिलक चूर्ण, अष्ठगंधा, पुष्पवृष्टी, मंगल कलश, शांती कलश याच्याद्वारे हा अभिषेक करण्यात आला. या अभिषेकाने आधीच सुंदर असलेली तीर्थकरांची मूर्ती अधिकच विलोभनीय दिसत होती. अभिषेक संपले तरी श्रावक दर्शन आणि प्रसाद घेण्यात दंग होते. या संपूर्ण सोहळ्याच्या आयोजनात संजय आडके, किरण तपकिरे, अमृत वणकुंद्रे, संदीप अथणे, सूरज नाईक यांनी पुढाकार घेतला.
यांनी केला महामस्तकाभिषेक
- मंगल कलश : प्रफुल्ल शिराळे, पिंटू थिटे, चेतन रोढे
- दुग्धाभिषेक : पुष्मा कुणे
- उसाचा रस : संगाडा कमलाकर
- हळदीभिषेक : प्रसाद देसाई, सुजाता आवटी
- सर्वोषध : संदीप अथणे
- कुंकुमाभिषेक : अनिल पाटील
- कलकचूर्ण : सूर्यकांत तपकिरे
- चर्तुश कोनाभिषेक : वडगावे व शिराळे परिवार
- अष्ठगंधाभिषेक : सुनील नागावकर
- पुष्पवृष्टी : निगवे परिवार
- शांतीकलश : आदित्य प्रशांत एकांडे
- सुगंधी कलश : शिल्पा पिराळे
- मंगल आरती : पद्मजा नाईक